जिल्हा बँकेसाठी रविवारी १४ मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान घेतले. ९८.२१ टक्के एवढे विक्रमी मतदान झाले होते. तदनंतर सोमवारी सकाळी येथील कल्याण मंडपम परिसरात निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश काकडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बालासाहेब नांदापूरकर, एम. यू. यादव यांच्या मार्गदर्शनात ७ टेबलांवर मतमोजणी झाली. निवडणुकीत यापूर्वीच १३ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित आठ जागांसाठी रविवारी मतदान झाले. सोमवारी झालेल्या मतमोजणीनंतर आ. सईद खान, आ.चंद्रकांत नवघरे, राजमती मुटकुळे, आकाश चोखट, नंदकुमार डाखोरे, अभय सावंत, शोभा बोबडे आणि दत्तात्रय मायंदळे यांनी विजय मिळवत बँकेच्या संचालक मंडळात प्रवेश निश्चित केला.
परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत वरपूडकर-बोडर्डीकर गटाने अपेक्षेप्रमाणे दमदार विजय मिळवत जिल्हा बँकेवरील सत्ता कायम राखली. २१ संचालक पदांपैकी तब्बल १७ जागांवर विजय मिळवत या गटाने स्पष्ट बहुमत सिद्ध केले असून विरोधी गटाचा धुव्वा उडविला आहे. या निकालामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राबरोबरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणातही वरपूडकर-बोर्डीकर गटाची ताकद अधोरेखित झाली आहे.
या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. कारण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही ग्रामीण अर्थव्यवस्था, पतपुरवठा आणि सहकार चळवळीचा केंद्रबिंदू मानली जाते. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल केवळ बँकेपुरता मर्यादित न राहता जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम करणारा ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. प्राथमिक कृषी पतपुरवठा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था गटातील पूर्णा मतदारसंघात नंदकुमार डाखोरे यांनी ३४ मते मिळवत विजय संपादन केला. त्यांचे प्रतिस्पर्धी तुळशीराम बोबडे यांना २८ मते मिळाली.
डाखोरे यांच्या विजयामुळे पूर्णा तालुक्यातील सहकारातील नेतृत्वाला बळ मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मानवत मतदारसंघात बँकेचे ज्येष्ठ संचालक तथा उपाध्यक्ष पंडितराव चोखट यांचे सुपुत्र आकाश चोखट यांनी २० मते मिळवत विजय मिळविला. प्रतिस्पर्धी अमोल कदम यांना १५ मतांवर समाधान मानावे लागले. या विजयामुळे चोखट कुटुंबाचा सहकार क्षेत्रातील प्रभाव कायम राहिल्याचे स्पष्ट झाले. हिंगोली मतदारसंघातून आ. तानाजी मुटकुळे यांच्या कुटुंबातील राजमती मुटकुळे यांनी ५९ मते मिळवत विजय मिळविला.
रमेश शिंदे यांना ३१ मते मिळाली, तर गुलाबराव सरकटे यांना एकही मत मिळाले नाही. मुटकुळे यांच्या विजयामुळे हिंगोलीतील राजकीय समीकरणे कायम राहिली. वसमत मतदारसंघातून आ. चंद्रकांत नवघरे यांनी ५८ मते मिळवत तुषार जाधव यांचा २० मतांवर पराभव केला. नवघरे यांच्या विजयामुळे त्यांच्या नेतृत्वावर मतदारांनी पुन्हा एकदा विश्वास दाखविल्याचे स्पष्ट झाले. कळमनुरी मतदारसंघात अभय सावंत यांनी ३५ मते मिळवत विजय मिळविला.
दत्तराव कदम यांना १२ तर बालासाहेब मगर यांना केवळ तीन मते मिळाली. संपूर्ण निवडणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी आणि चुरशीची लढत इतर शेती संस्था गटात झाली. या गटात आ. सईद खान आणि विजय जामकर यांच्यात शेवटच्या फेरीपर्यंत काट्याची टक्कर पाहायला मिळाली. अखेर आ. सईद खान यांनी २९० मते मिळवत विजय जामकर यांच्या २८७मतांवर अवघ्या तीन मतांनी मात केली. या निकालाने मतमोजणी केंद्रात एकच जल्लोष झाला. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात शोभा बोबडे यांनी तब्बल १२१६ मते मिळवत मोठा विजय नोंदविला. प्रशास ठाकूर यांना १२, अतुल सरोदे यांना १७६ तर संजय सारणीकर यांना तीन मते मिळाली.
बोबडे यांच्या विजयाने या गटात वरपूडकर-बोर्डीकर गटाची ताकद अधोरेखित झाली. विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघात विद्यमान संचालक दत्तात्रय मायंदळे यांनी १०६६ मते मिळवत मोठा विजय मिळविला. स्वराजसिंह परिहार यांना ३४८, सुनंदा फुलके यांना नऊ, बळीराम सोरेकर यांना तीन तर अभय कुंडगीर यांना पाच मते मिळाली. निकाल जाहीर होताच मतमोजणी परिसरात पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गुलालांची उधळण करत जल्लोष साजरा केला.
निकालानंतर परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील सत्ता पुन्हा एकदा वरपूडकर-बोडर्डीकर गटाकडे गेली आहे. जिल्हा बँकेवरील नियंत्रणामुळे ग्रामीण भागातील पतपुरवठा, सहकारी संस्था आणि कृषी विकासाच्या धोरणांवर या गटाचा प्रभाव कायम राहणार आहे. त्याचबरोबर आगामी कृषी उत्पन्न बाजार समित्या तसेच इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरही या निकालाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, या निवडणुकीने जिल्ह्यातील सहकाराचे नेतृत्व पुन्हा एकदा वरपूडकर-बोडर्डीकर गटाकडे केंद्रित केले आहे.