Parbhani Criminal arrested, stolen mobile phones seized
पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : रेल्वे प्रशासनाने सुरू केलेल्या ऑपरेशन यात्री सुरक्षा या विशेष मोहिमेंतर्गत रेल्वे सुरक्षा दल व लोहमार्ग पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. अटक आरोपीकडून चोरीचे चार मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत सुमारे ३० हजार ५०० रुपये आहे.
सदरील कारवाई नांदेड रेल्वे विभागाच्या हद्दीत येणार्या छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर घडलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली. दि.२४ आणि २५ जून रोजी मध्यरात्री साडेबारा ते ५ वाजेच्या दरम्यान तीन प्रवाशांचे मोबाईल अज्ञात व्यक्तीने चोरले होते.
याबाबत छत्रपती संभाजीनगर रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या. यानंतर रेल्वे सुरक्षा दलाच्या नांदेड टीमने मिळविलेल्या माहितीच्या आधारे आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांनी संयुक्त कारवाई करत नगरसोल रेल्वे स्थानकावरून शेख शकील (वय ३२, रा. संभाजीनगर) या संशयित चोरट्याला अटक केली. त्याने मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली असून चोरीच्या मोबाईल फोनचा वापर विक्रीसाठी करण्याचा त्याचा हेतू असल्याचे तपासात समोर आले आहे.