

घनसावंंगी ः घनसावंगी तालुक्यातील शिंदेवडगाव शिवारात जुन्या भांडणाच्या कारणावरून विधी संघर्ष बालकाने गावठी पिस्तुलमधून गोळीबार केल्याची घटना घडली.या प्रकरणी घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील शिंदेवडगाव शिवारात 25 जून रोजी रात्रीच्या सुमारास विकास जंडे यांच्या शेतातील आखाड्यात विधीसंघर्ष बालक (रा. शिंदेवडगाव) याने जुन्या भांडणाच्या कारणावरून रागाच्या भरात ऋषीकेश याच्या दिशेने गावठी पिस्तुलमधून एक गोळी फायर केली.ही गोळी ऋषीकेश दत्तात्रेय दाते याच्या तोंडावर व नाकावर लागल्याने तो जखमी झाला. ऋषीकेश व विधी संघर्ष बालक हे दोघे मित्र होते.मात्र मागील भांडणाच्या कारणातून विधी संघर्ष बालकाने ऋषीकेशवर गावठी पिस्तुलमधून गोळी झाडली. या हल्ल्यामुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. या प्रकाराने परिसरात प्रचंड खळबळ उडाली.
या प्रकरणी घनसावंंगी पोलिस ठाण्यात गुरुवार (26)रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक पवार हे करीत आहेत.विधी संघर्ष बालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून पिस्तूल कोठून आणले याबाबतची माहिती घेण्यात येत असल्याची माहिती ऐकावयास मिळाली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी खांबे, पोलिस निरीक्षक राठोड, पोलिस उपनिरीक्षक पवार आदींनी भेट देऊन पाहणी केली. पोलिस गोळीबार प्रकरणाचा शोध घेत आहेत.