फटाक्यांच्या वादातून मारहाण झालेल्या तरुणाचा मृत्यू Pudhari
परभणी

Parbhani Crime: फटाक्यांच्या वादातून मारहाण झालेल्या तरुणाचा मृत्यू; बोरीतील बाजारपेठा बंद

पिंपरी रोहिला येथील घटना; नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या, आज बोरी व झरीतील बाजारपेठ बंद

पुढारी वृत्तसेवा

बोरी : येथून जवळ असलेल्या पिंपरी रोहिला येथे २१ ऑक्टोबर रोजी दोन गटांमध्ये दिवाळीतील फटाके फोडण्याच्या किरकोळ कारणावरून मारहाणीची घटना घडली. यातील एका जखमीचा नांदेड येथील रुग्णालयात गुरुवारी (दि.६) उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाईक व नागरिकांनी पोलीस ठाण्यात मृतदेह आणून या मांडला. दरम्यान संतप्त झालेल्या हिंदू बांधवांच्या वतीने शुक्रवारी बोरी व झरी येथील बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पिंपरी रोहिला येथे दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मोठी मारहाण झाली होती. या घटनेनंतर बोरी पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूंनी फिर्यादी दाखल करण्यात आली. यात विशाल विठ्ठल डुकरे यांच्या फिर्यादीवरून 12 जणांवर तर शेख मोहसीन शेख आजम यांच्या फिर्यादीवरून 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या हाणामारीत गंभीर जखमी मारोती निवृत्ती डुकरे (वय 43) यांचा उपचारा दरम्यान गुरुवारी (दि. 6) सकाळी नांदेड येथील रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच पिंपरी रोहिला, बोरीसह परिसरात शोककळा पसरली.

मयताचे पार्थिव पोलिस ठाण्यात आणल्याने मोठा गोंधळ उडाला होता. अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ, सहाय्यक पोलिस अधीक्षक जीवन बेनिवाल, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील, बोरीचे सपोनि रामेश्वर धोंडगे यांनी जमावाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी मयताचे नातेवाईक व नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे काही मागण्या केल्या. त्यामध्ये घटनेची चौकशी विशेष तपास पथकाकडून (एसआयटीमार्फत) करण्यात यावी, आरोपींची संपत्ती जप्त करून मयताच्या कुटुंबास आर्थिक सहाय्य द्यावे, फरार आरोपींना तात्काळ अटक करावी, घटनेशी संबंध नसलेल्या हिंदू तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत अशा मागण्या समाविष्ट होत्या.

यावर अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ म्हणाले की, जर कोणत्याही हिंदू तरुणांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले असतील, तर त्याची चौकशी करून योग्य ते निर्णय घेतले जातील. मात्र, नागरिकांनी शांतता राखून मयताचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करावेत, असे आवाहन केले. दरम्यान, मयताचे पार्थिव बोरी पोलिस ठाण्यात आणल्यानंतर महिलांसह नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. पोलिस प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी खबरदारीचे उपाय करत परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT