

Bori Dam at Naldurg was filled, Sandwa began to flow
नळदुर्ग, पुढारी वृत्तसेवा : नळदुर्ग येथील बोरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून गुरुवारी (दि. १४) पहाटेपासून धरणाचा सांडवा वाहण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे तुळजापूर, नळदुर्ग, अणदूर यांसारख्या मोठ्या शहरांसह ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. या वर्षी मे महिन्यात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली होती.
जून महिन्यात पाणलोट क्षेत्रातील सलगरा दिवटी आणि होर्टी येथील साठवण तलाव पूर्ण भरल्याने बोरी धरण लवकर भरेल अशी आशा होती. मात्र, त्यानंतर पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने धरण भरण्यास विलंब झाला. गेल्या आठ-दहा दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे अखेर हे धरण पूर्ण भरले. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पाणलोट क्षेत्रातील चिकुंद्रा, मानेवाडी, हगलुर, मूरटा या गावांतील शेतकऱ्यांसह येडोळा, निलेगाव, अणदूर, खुदावाडी, वागदरी, गुजनूर, शहापूर, दहिटना, गुळहल्ली या दहा गावांतील सुमारे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांना आगामी रब्बी हंगामासाठी आणि ऊस पिकासाठी पाणी मिळणार आहे.
यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, धरण पूर्ण भरल्यामुळे नळदुर्ग येथील प्रतिष्ठित नागरिकांनी जलपूजन केले. यामध्ये माजी नगरसेवक विनायक अहंकारी, सुधीर हजारे, पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे, विकास सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव आणि पत्रकार उत्तम बनजगोळे यांचा समावेश होता. धरणाचा सांडवा वाहत असल्यामुळे बोरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नळदुर्ग किल्ल्यातील ऐतिहासिक नर-मादी धबधबाही सुरू झाला आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.