Police Pudhari
परभणी

Parbhani Police Attack | गोंडगे पिपरी शिवारात चाकू हल्ल्यात पोलिस गंभीर जखमी; फरारी आरोपीसह इतरांवर गुन्हा दाखल

स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकावर कारवाईदरम्यान फरारी आरोपीचा चाकूने हल्ला

पुढारी वृत्तसेवा

Knife Attack on Policeman

चारठाणा : स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकावर कारवाईदरम्यान फरारी आरोपीने चाकूने हल्ला केल्याची गंभीर घटना गोंडगे पिपरी शिवारात घडली. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी निलेश भुजबळ गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सोमवारी (दि.१६) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली

मिळालेल्या माहितीनुसार, पाथरी पोलीस ठाण्यातील २०१७ सालच्या दरोडा प्रकरणातील (कलम ३९५ भादंवि) फरारी आरोपी दीपक बिरजू भोसले हा गोंडगे पिपरी परिसरात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हा शाखेला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप, पोलीस उपनिरीक्षक परिहार आणि पथकातील कर्मचारी सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास शोधमोहीमेसाठी रवाना झाले.

दरम्यान, संशयित दीपक भोसले याला पाहताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पोलीस कर्मचारी निलेश भुजबळ यांनी त्याचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला असता, भोसले याने दात्र्यासारख्या धारदार चाकूने त्यांच्या पाठीवर हल्ला केला. या हल्ल्यात भुजबळ गंभीर जखमी झाले.

जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना परभणी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या घटनेदरम्यान आरोपीच्या साथीदारांनीही एकत्र येत पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला आणि पथकावर धावून जाण्याचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमी कर्मचाऱ्यांची प्रकृती जाणून घेतली. या प्रकरणी निलेश भुजबळ यांच्या फिर्यादीवरून दीपक बिरजू भोसले आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT