परभणी : काही महिन्यांपूर्वी परभणी शहराला हादरवून सोडणाऱ्या संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता सोपान पवार याने गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. 12) सकाळी उघडकीस आली. मिर्झापूर (ता. परभणी) येथील राहत्या घरी त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. विशेष म्हणजे, न्यायालयाच्या आदेशाने जामिनावर सुटका होऊन अवघे चार दिवस उलटत नाहीत तोच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची 10 डिसेंबर 2024 रोजी तोडफोड करण्यात आली होती. या घटनेचे शहरात आणि राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. शहरात तणाव निर्माण होऊन त्याचे रूपांतर दंगलीत झाले होते. या दंगलीत सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. पोलिसांनी वेगाने तपास करत मिर्झापूर येथील दत्ता सोपान पवार याला मुख्य आरोपी म्हणून अटक केली होती.
गावातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता पवार हा मानसिक आजाराने ग्रस्त होता आणि त्याच्यावर मागील अनेक महिन्यांपासून उपचार सुरू होते. त्यातच पत्नी आणि मुले त्याला सोडून गेल्याने तो घरात एकटाच राहत होता. सोमवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास त्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी परभणीच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या जीवन संपवण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिस अधिक तपास करत आहेत.
चार दिवसांपूर्वीच झाली होती सुटका
न्यायालयीन सुनावणीअंती दत्ता पवार याला जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आणि जामिनाची रक्कम भरण्यासाठी कोणीही पुढे न आल्याने तो कारागृहातच होता. अखेर 8 जानेवारी रोजी न्यायालयाने स्वतःहून पुढाकार घेत त्याची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला सुरक्षितपणे मिर्झापूर येथील घरी नेऊन सोडले होते.