बालगोपाल आणि तरुण मंडळींनी पारंपरिक ‘धोंडी’ची प्रथा जोपासत त्यांनी गावभर फिरून पावसासाठी वरुणराजाला साकडे घातले Pudhari
परभणी

Parbhani Rain Update | "धोंडी धोंडी पाणी दे...'' चारठाण्यात पावसासाठी वरुणराजाला साकडे

चारठाणा व परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

Charthana Kharif Crops In Danger

चारठाणा : चारठाणा व परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. पावसासाठी आसुसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला बालगोपाल आणि तरुण मंडळी धावून आली असून, पारंपरिक ‘धोंडी’ची प्रथा जोपासत त्यांनी गावभर फिरून पावसासाठी वरुणराजाला साकडे घातले.

गुरुवारी आणि शुक्रवारी चारठाणा शहरासह ग्रामीण भागात बालगोपाल व तरुण मंडळींनी ‘धोंडी धोंडी पाणी दे, धोंड्याचे पाणी लयं हिवस’, ‘कोंबड भुक्या पाणी दे’, ‘भोंबळ भिक्या पाणी दे’ अशा पारंपरिक घोषणा देत नागरिकांच्या घरी जाऊन दान मागितले. या दानातून वरुणराजाला प्रसाद अर्पण करून लवकरात लवकर पाऊस पडावा, अशी प्रार्थना करण्यात आली. या उपक्रमात औंढा नागनाथ येथील काही तरुणांनीही सहभाग घेतला.

यंदा पावसाळ्याला सुरुवात झाल्याची चाहूल लागली असली तरी चारठाणा व परिसरात अद्याप मोठा पाऊस झालेला नाही. सुरुवातीच्या रिमझिम पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली. सध्या सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यांसह विविध पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने पिकांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे.

पावसाने आणखी दहा दिवस दडी मारल्यास माळरानावरील तसेच ओलीताच्या जमिनीवरील खरीप पिकांवर नांगर फिरवण्याची वेळ येण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मोठ्या कष्टाने शेताची मशागत करून पेरणी केली; मात्र आता पाऊस कधी पडणार, पिके वाचणार की त्यावर औत फिरवावे लागणार, या चिंतेने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे वरुणराजाने कृपादृष्टी करून दमदार पाऊस पाडावा, अशी आर्त हाक शेतकरी आणि ग्रामस्थांकडून दिली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT