Nathjal water bottle price hike pudhari photo
परभणी

Parbhani News : अधिकाऱ्यांना फुकट पाणी, प्रवाशांची मात्र लूट

परभणी बसस्थानकात नाथजलची अधिकच्या 5 रुपये दराने सर्रास विक्री, परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

परभणी : उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे बाटलीबंद पाण्याची मागणी वाढली असताना परभणी बसस्थानकावर नाथजल पाण्याची चढ्यादराने विक्री होत असल्याचे समोर आले. अधिकृतपणे 15 रुपयांना विकली जाणारी पाण्याची बाटली प्रवाशांना 20 रुपयांना दिली जात असल्याने दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची सर्रास लूट होत आहे.

परभणी बसस्थानकावरून दररोज हजाराहून अधिक प्रवासी विविध मार्गांवर प्रवास करतात. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर थंड पाणी आणि बाटलीबंद पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचाच फायदा घेत बसस्थानकातील नाथजल विक्रेते, स्टॉलधारक तसेच फिरते विक्रेते मनमानी दर आकारत असल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे, अनेक दुकानांपुढे पूर्वी लावलेले दरपत्रक किंवा पाण्याच्या बाटलीचे अधिकृत दर दर्शवणारे स्टिकर काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिकृत दराची माहिती मिळत नाही आणि त्यांना वाढीव दर देऊन पाणी खरेदी करावे लागत आहे. या प्रकाराबाबत राज्य परिवहन महामंडळातील संबंधित अधिकाऱ्यांना माहिती असूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे.

काही ठिकाणी अधिकाऱ्यांना मोफत पाणी पुरवले जात असल्याची चर्चा असून, त्यामुळेच या प्रकारावर कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे. प्रवाशांनी प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन पाण्याच्या बाटलीची विक्री अधिकृत दरानेच होईल याची खात्री करावी, तसेच नियमभंग करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, संबंधित विभागाने तपासणी मोहीम राबवून प्रवाशांची होणारी लूट थांबवणे गरजेचे असल्याचेही नागरिकांचे मत आहे.

अधिकारी गप्प का?

बसस्थानक परिसरात नाथजल या बाटलीबंद पाण्याची 15 रुपयांऐवजी 20 रुपये प्रति बॉटल राजरोसपणे विक्री होत आहे. बसस्थानकप्रमुख व आगार प्रमुखांना त्याची माहिती असूनही पाणी विक्रेत्यांच्या मनमानीला आगारप्रमुख लगाम घालू शकत नसल्याचे दिसत आहे. एकंदरीत बाटलीबंद पाण्याचा धंदा तेजीत आला असून प्रवाशांची हजारो रुपयाला लूट होत असल्याचे दिसत.

एसटीच्या मूळ उद्देशालाच हरताळ

नाथजल बाटलीबंद पाणी ही राज्य परिवहन महामंडळाची विशेष योजना आहे. खाजगी ब्रँडच्या महागड्या पाण्याच्या बाटल्यांना पर्याय म्हणून व प्रवाशांना किफायतशीर दरात पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून नाथजल सुरू केले. असे असताना बसस्थानक परिसरातील स्टॉलधारक व फिरस्ती विक्रेते एसटी महामंडळाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासत असल्याचे दिसत आहे.

तक्रार दाखल करण्याचा अधिकार

बसस्थानकात नाथजल या पाणी बॉटलची 15 रुपयांऐवजी 20 रूपयाला विक्री होत असेल तर बसस्थानक प्रमुख अथवा आगारप्रमुखांना प्रवासी तक्रार करू शकतात. प्रवासी प्रवासाच्या निमित्ताने घाईगडबडीत असल्यामुळे तक्रार करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. याचा फायदा बसस्थानकात नाथजल पाणी बॉटल विकणारे विक्रेते घेत असल्याचे दिसून येत असून दिवसासाठी प्रवाशांची हजारो रुपयांची लूट होत असल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT