

वेलंग : पाच तालुक्यांची तहान भागवणारे धोम धरण आणि त्यावरील कालवा व्यवस्थापन सध्या पूर्णपणे रामभरोसे आहे. त्यातच धोम धरणाच्या कालव्यांची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी कालव्यांना भगदाड पडल्याने पाणी वाया जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन व नियंत्रण करण्यात पाटबंधारे प्रशासन अपयशी ठरले असून, विशेषतः पाटकऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
धोम धरणाच्या कालव्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून अनेक ठिकाणी ओढे, नाले व रस्त्यांमध्ये थेट मोकळे पाणी सोडले जात आहे. परिणामी हजारो क्यूसेक्स पाणी कोणताही उपयोग न होता वाया जात आहे. काही ठिकाणी रस्त्यांवरून पाणी वाहत आहे, तर काही ठिकाणी ओढ्या-नाल्यांतून बेधुंद प्रवाह सुरू आहे.
एकीकडे शेतकरी पाण्यासाठी वणवण भटकत असताना, दुसरीकडे प्रशासकीय पातळीवरील पाटकरी व संबंधित अधिकारी या गंभीर प्रश्नाकडे डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे. खिसे गरम करण्याच्या नादात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र आहे. धोम पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रात वारंवार कालवा फुटीचे प्रकार घडत असताना वाया जाणारे पाणी रोखणार तरी कसे? असा सवाल केला जात आहे.
दरम्यान, चिरीमिरीसाठी तसेच वीटभट्टी व्यावसायिकांच्या फायद्यासाठी ओढ्या-नाल्यांत सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा हिशोबच नाही. जाणीवपूर्वक सोडल्या जाणाऱ्या या पाण्याला ना मोजमाप आहे, ना नियंत्रण आणि ना कोणतीही ठोस जबाबदारी निश्चित केलेली आहे. याप्रकरणी सबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणी होत आहे. धोम पाटबंधारे विभाग व संबंधित वरिष्ठ अधिकारी या गंभीर प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देणार का? की शेतकऱ्यांच्या जीवावर अशीच पाण्याची उधळपट्टी सुरू राहणार? हा प्रश्न परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.