वंचित बहुजनची सय्यद समी साहेबजान लाला यांना उमेदवारी  pudhari photo
परभणी

Parbhani Assembly Election : वंचित बहुजनची माजूलाला यांना उमेदवारी

पुढारी वृत्तसेवा

परभणी, पुढारी वृत्तसेवा वंचित बहुजन आघाडीने मंगळवारी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा सोपस्कार तर पार पाडला मात्र दुसऱ्याच दिवशी बुधवारी (दि.९) परभणी मतदारसंघातून माजी उपमहापौर सय्यद समी साहेबजान लाला ऊर्फ माजूलाला यांना उमेदवारी जाहीर करीत आश्चर्याचा धक्का दिला.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी १० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीतील सर्व उमेदवार हे मुस्लिम समाजातील आहेत. परभणीतही मुस्लिम प्राबल्य लक्षात घेऊन सक्षम उमेदवार देण्याच्या दृष्टीने व वंचित बहुजन आघाडीने माजूलाला यांना उमेदवारी बहाल केली आहे. परभणी मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत तिसरा पर्याय हा निवडणुकीची चुरस वाढविण्यात महत्त्वपूर्ण ठरलेला आहे.

त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत ही सातत्याने पहावयास मिळते. याही वेळी वंचित बहुजन आघाडीकडून व एमआयएमकडून या मतदारसंघात उमेदवार दिला जाईल, हे अपेक्षितच होते. वंचितने राज्य पातळीवर कोणाशीही आघाडी न करण्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. आंबेडकर यांनी पहिल्या टप्प्यानंतर जाहीर केलेल्या दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील तीन मतदारसंघात मुस्लिम उमेदवारांची नावे समाविष्ट आहेत. परभणी मतदारसंघात उमेदवारी दिलेले माजूलाला हे अलीकडेच काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात दाखल झाले होते.

तत्पूर्वी ते काँग्रेसमध्ये राहिलेले आहेत काँग्रेसमध्ये असताना २०१७ ते २२ च्या दरम्यान त्यांनी उपमहापौर म्हणूनही काम पाहिले आहे. सभागृह नेता म्हणूनही काम पाहिले होते. माजी उपनगराध्यक्ष कै. सज्जूलाला यांचे ते कनिष्ठ बंधू होत. सज्जूलाला यांनी एमआयएमच्या तिकिटावर २०१४ मध्ये निवडणूक लढविली होती. त्यात ४५ हजार इतकी लक्षवेधक मते मिळवत दुसरे स्थान पटकावले होते.

त्यांच्यानंतर माजूलाला हे राजकारणात अधिक सक्रिय झाले काँग्रेसच्या माध्यमातून नगरसेवक व उपमहापौरपद भूषवल्यानंतर जानेवारीतच ते शिवसेना शिंदे गटात दाखल झाले होते. शिवसेनेचे अल्पसंख्याक आघाडीचे प्रदे- शाध्यक्ष सईद खान यांच्यामार्फत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता व ते या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. त्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीकडे त्यांनी अचानक उमेदवारी मागितली व त्यांना ती जाहीरही झाली आहे.

महाविकास आघाडीसाठी धक्का

परभणी मतदारसंघ हा मुस्लिम प्राबल्याचा असून निर्णायक मुस्लिम मतांमुळे मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत एक मुस्लिम उमेदवार रिंगणात येतच असतो. यावेळी माजूलाला हे वंचितच्या तिकिटावर रिंगणात येत असल्याने ते मोठी चुरस निर्माण करतील. वंचित मुस्लिम मतांवर लक्ष केंद्रित करणार असल्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाविकास आघाडीच्या मतांचे ध्रुवीकरण होणार हे यामुळे निश्चित झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT