परभणी : दैठणा ते माळसोना रस्त्यावर मंगळवारी (दि.१४) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दोन दुचाकींच्या झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. यात एकाची प्रकृती गंभीर आहे.
नामदेव ज्ञानदेव गिराम (रा. पोरवड) हे एम एच २२ए क्यू ४३४७ या दुचाकीवरून पोखर्णीकडे जात असताना मागून आलेल्या एम एच २२ बी एच २९७३ क्रमांकाच्या दुचाकीने जोराची धडक दिली. ही दुचाकी गणेश बालासाहेब आव्हाड (रा. पाथरी) हे चालवत होते. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या नामदेव गिराम यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. दुसरी दुचाकी चालवणारा गणेश आव्हाड गंभीर जखमी झाला असून, त्याच्या सोबत असलेला लहान भाऊ किरकोळ जखमी झाला आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच दीपक कच्छवे यांनी रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलवले. या प्रकरणी मुंजाजी गिराम यांच्या फिर्यादीवरून गणेश आव्हाड याच्याविरुध्द दैठणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.