परभणी

Parbhani Accident : दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू, जिंतूर तालुक्यातील घटना; डांबरीकरणाच्या कामामुळे घटना घडल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

चारठाणा : जिंतूर-जालना मार्गावरील मालेगाव-खडकपाटी परिसरात दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात एका ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी (दि. ५) दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर दत्तात्रय बुधवत (वय ३५, रा. जांब बुद्रुक) असे अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, ही दुर्घटना रस्त्याच्या सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या कामुळे झाल्याचा आरोप होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर बुधवत हे सोमवारी दुपारी आपल्या दुचाकीने मालेगाव-खडकपाटी रस्त्यावरून जात होते. त्या भागात रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू होते. रस्त्यावर खडी व डांबर टाकण्यात आले होते. दरम्यान, ज्ञानेश्वर यांची दुचाकी अचानक घसरली आणि ते रस्त्यावर जोरात पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक सचिन आडे, सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात आणि रुग्णवाहिका चालक संतोष जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या ज्ञानेश्वर यांना जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलसुम खाजा यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

ज्ञानेश्वर यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाइकांनी रुग्णालयात गर्दी केली होती, तर कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वृत्त लिहीपर्यंत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT