परभणी

परभणी : दोन वेगवेगळ्या कारवाईत गुटख्यासह ७ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त

अविनाश सुतार

चारठाणा, पुढारी वृत्तसेवा: मंठा येथून दुचाकीवरून अवैधरित्या गुटख्याची विक्री करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी (दि.८) सकाळी १० वाजता चारठाणा पोलिसांनी देवगाव फाटा येथे केली. त्याच्याकडून २१ हजारांच्या गुटख्यासह दुचाकी असा ८१,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस नाईक विष्णुदास गरुड यांच्या फिर्यादीवरून योगेश शेषराव राठोड (रा.कोलदंडी तांडा, ता. जिंतूर) याच्यावर चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सुनील वासलवार, विष्णुदास गरुड व पवन राऊत यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद साने करीत आहे.

तर दुसरी कारवाई देवगाव फाटा येथील करपरा नदीच्या पुलाजवळ आज (दि.९) पहाटे दोनच्या सुमारास केली. मंठा येथून बोरीकडे जाणाऱ्या एका कारमध्ये गुटखा येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक विनोद साने, जामदार सुनील वासलवार, शेख जिलानी यांनी कार थांबून झडती घेतली असता त्या कारमध्ये गुटखा आढळून आला.

या कारवाईत ३ लाख १६ हजारांचा गुटखा व ३ लाख ५० हजारांची कार असा एकूण ६ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी साई दिलीपराव देशमुख (रा. वसा, ता. जिंतूर) याच्याविरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड करीत आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT