Purna Pan Shop Closure
पूर्णा : शहरासह ग्रामीण भागातील अनेक पानटपऱ्या गेल्या आठवडाभरापासून बंद असल्याचे चित्र दिसून येत आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या गुटखा व अन्नभेसळविरोधी कारवाईमुळे विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी स्वेच्छेने दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.
गुटखा बंदी कायदा अस्तित्वात असतानाही अनेक पानटपऱ्या, किराणा दुकाने आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमधून विविध कंपन्यांच्या गुटखा पुड्या, सुगंधी तंबाखू, सुपारी आणि तत्सम पदार्थांची विक्री सुरू असल्याचे चित्र अनेक वर्षे पाहायला मिळत होते. यामुळे तरुणांसह विविध वयोगटांतील नागरिकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढल्याची तक्रार वारंवार पुढे येत होती.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे तोंडाचा व घशाचा कर्करोग, दंतविकार तसेच इतर गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे अशा पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने कारवाईची मोहीम तीव्र केली आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकांकडून राज्यभर सुरू असलेल्या धडक तपासण्या आणि कारवाईमुळे गुटखा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. परिणामी अनेक पानटपऱ्या बंद असून बाजारात गुटखा व मावा सहज उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे. कारवाईच्या भीतीमुळे अनेक विक्रेते माल साठवणे किंवा विक्री करणे टाळत असल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे, गुटखा सेवनाची सवय असलेल्या ग्राहकांना संबंधित पदार्थ मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत असून अनेकजण विविध ठिकाणी शोध घेताना दिसत आहेत. मात्र बहुतांश ठिकाणी पानटपऱ्या बंद असल्याने त्यांना निराश होऊन परतावे लागत आहे.
अन्नभेसळ आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अशा कारवाया आवश्यक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
गुटखा व अन्नभेसळविरोधात प्रभावी कारवाई होत असताना अनेक भागांमध्ये अवैध मद्यविक्री सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यरत असतानाही काही ठिकाणी अवैध दारू विक्रीवर पूर्णपणे नियंत्रण आलेले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे गुटखा बंदीसोबतच अवैध मद्यविक्री रोखण्यासाठीही अशाच प्रकारच्या कठोर उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे.