New C-band radar approved for Parbhani division, weather forecast for Marathwada increased
परभणी, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यातील हवामान अंदाजासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण व पाणीपुरवठा राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर परभणी विभागासाठी नवीन सी-बँड डॉपलर वेदर रडार (डीडब्ल्यूआर) बसविण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने 'मिशन मौसम' योजनेंतर्गत मंजूर केला आहे.
केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्रसिंह यांनी पाठविलेल्या पत्राद्वारे ही मंजुरी मिळाल्याची माहिती दिली आहे. सध्या सोलापूर येथे कार्यरत असलेला २५० कि. मी. परिधाचा रडार परभणी व नांदेड परिसरातील हवामान निरी क्षणासाठी वापरला जात आहे. तथापि, स्थानिक पातळीवरील अचूक हवामान अंदाजासाठी स्वतंत्र रडार केंद्राची गरज भासत होती.
या मंजुरीनंतर परभणी विभागात सी-बैंड रडार उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, त्यामुळे मराठवाड्यातील हवामान निरीक्षण, पूर्वसूचना आणि पिक संरक्षण क्षमतांमध्ये मोठी वाढ होणार आहे. तसेच म्हैसमळ टेकडी, छत्रपती संभाजीनगर येथे सो-बैंड प्रकारचा २५० कि.मी. परिघाचा रडार बसविण्याचे कामही सुरू आहे. या दोन्ही केंद्रांच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाडा प्रदेशाचे हवामान अधिक अचूकपणे नोंदवता येईल.
राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, मराठवाडा हा दुष्काळप्रवण प्रदेश असून शेतकऱ्यांना वेळेवर हवामानाची अचूक माहिती मिळणे अत्यावश्यक आहे. या रडारमुळे शेती, पिकसंरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी अधिक नेमकी माहिती उपलब्ध होईल, केंद्र सरकारकडून मिळालेल्या या सकारात्मक प्रतिसादामुळे मराठवाड्यातील हवामान अंदाज व्यवस्था अधिक सक्षम होणार असून, साकोरे-बोर्डीकर यांनी या निर्णयाबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.