मानवत : दारू पिण्यासाठी पैसे का देत नाही तसेच जुन्या वादाच्या शिल्लक कारणावरून शहरातील ज्ञानेश्वर वैजनाथ पवार या टेम्पो चालकाचा कुदळीने डोक्यात घाव घालून निर्घृण खून केलेल्या प्रकरणातील फरार झालेला मुख्य आरोपी मारोती भगवान चव्हाण ला शोधून काढून तात्काळ अटक करून कडक शिक्षा द्या या मुख्य मागणीसाठी गुरुवारी ता. 31 येथील पोलीस ठाण्यावर संतप्त झालेल्या महिलांसाह नागरिकांनी मोर्चा काढला.
सदरील दुर्देवी घटना शनिवारी ता 26 दुपारी एकच्या सुमारास रिंगरोड वरील मानोली नाका एका हॉटेल मध्ये घडली होती. ज्ञानेश्वर पवार हे त्याठिकाणी चहा पिण्यासाठी त्यांच्या मित्रांसोबत आले होते. शहरातील कोकर कॉलनी येथे ज्ञानेश्वर पवार हे आपल्या पत्नी, एक मुलगा व एक मुलीसह राहत होते तर त्यांच्याकडे टेम्पो असून ते टेम्पो भाड्याने चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या या हत्येमुळे संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झाले असून कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
याप्रकरणी मयताचा पुतण्या अभिषेक मारुती पवार वय 24 याच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात मारोती चव्हाण वर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान खुनाच्या घटनेनंतर आरोपी मारुती चव्हाण फरार झाला होता तो सहा दिवसानंतरही गुरुवार ता 31 पर्यंत पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शहरातील संत जगनाडे महाराज चौकापासून मुख्य रस्त्याने पोलीस ठाण्यावर मोर्चा काडून पोलीस प्रसासनास चांगलेच धारेवर धरले. आरोपीचा तात्काळ शोध घेऊन अटक करावी व कडक शासन करावे, प्रकरणाचा तपास करून दोषीवर कठोर कारवाई करावी, आरोपीस मदत करणाऱ्या वरही कायदेशीर कारवाई करावी, तसेच येत्या 48 तासात आरोपीला अटक नाही केल्यास याप्रकरणी शहर बंद ठेवून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा निवेदनाद्वारे मोर्चाकऱ्यांनी दिला.
सदरील मोर्चा शहरातील तेली समाज बांधवांच्या वतीने काढण्यात आला असला तरी शहरातील सर्व समाजातील नागरीक विशेषतः महिला मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या. सदरील मोर्चात सतीश नगरसाळे, राजकुमार खरात, अभिजित करपे, अविनाश देशमाने, मनोज सिसोदे, गणेश पवार, अमोल दिशागत, सुशांत काळे, कृष्णा कदम, श्रीकांत माकोडे, गणेश घोडके, भारत करपे, प्रभाकर गवळी, शाहिद कुरेशी, सुरेखा देशमाने, शकुंतला शिरसागर, कमल देशमाने, लता सारखळे, सविता शिंदे, सुरेखा रोडे, संतोषी वाघमारे, वत्सला राऊत, कमल चिंचकर, कल्पना शास्त्री, आयोध्या धडे, नीता महात्मे यांचेसह नागरीक व महिला मोठ्या संख्येने सामील झाले होते.