Parbhani Municipal Corporation / परभणी शहर महानगरपालिका Pudhari News Network
परभणी

Municipal elections : प्रशिक्षणास गैरहजर राहिल्यास होणार कारवाई

मनपा निवडणूक : ४१ मतदान केंद्रांची उभारणी; १८०० अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती

पुढारी वृत्तसेवा

Municipal elections: Action will be taken against those who remain absent from the training.

परभणी, पुढारी वृत्तसेवा: शहर महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी निवडणूक प्रशासनाने सर्व पातळ्यांवर नियोजन पूर्ण करत तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे. शहरातील विविध भागांत १४६ इमारतींमध्ये एकूण ३४१ मतदान केंद्रे (यूथ) स्थापन करण्यात आली असून मतदान प्रक्रिया पारदर्शक, शांततामय व सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. दरम्यान दि.५ जानेवारीला पहिले तर दि.१० जानेव-ारीला दुसरे प्रशिक्षण होणार असून यास गैरहजर अथवा कसूर केल्यास कठोर कारवाईचा इशारा संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.

सदरील मतदान केंद्रांवर कामकाजासाठी राखीव कर्मचाऱ्यांसह एकूण १ हजार ८०० मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदानाच्या दिवशी कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी मनुष्यबळाचे काटेकोर नियोजन करण्यात आले असून प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

निवडणूक प्रक्रियेत नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियम, जबाबदाऱ्या व कार्यपध्दतींचे प्रशिक्षण देण्यासाठी दि.५ जानेवारी रोजी पहिले प्रशिक्षण तर दि.१० जानेवारी रोजी दुसरे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण ५ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. प्रभागनिहाय मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी बि. रघुनाथ सभागृह, कल्याण मंडपम् तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ऑडिटोरियम हॉल ही ३ प्रमुख ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

प्रशिक्षणा दरम्यान मतदान प्रक्रिया, ईव्हीएम/मतदान यंत्रांची हाताळणी मतदार सहाय्य, कायदे व आचार संहितेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. निवडणूक कामासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळेत कामावर रुजू होणे तसेच दोन्ही प्रशिक्षण सत्रांना उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले.

कोणत्याही प्रकारची हयगय, टाळाटाळ, गैरहजेरी किंवा कसूर खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आला. निवडणूक कामात कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० चे कलम २९ व ३० तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ चे कलम १३४ (व) नुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

७९ झोनल अधिकारी नियुक्त

निवडणूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी प्रशासनाने एकूण ७९ झोनल अधिकारी नियुक्त केले. यात प्रभाग १, २ व ७ साठी १५ झोनल अधिकारी, प्रभाग ३, ४, ५ व ६ साठी १५ झोनल अधिकारी, प्रभाग ८, ९ व १४ साठी १६ झोनल अधिकारी, प्रभाग १०, ११ व १३ साठी १३ झोनल अधिकारी, प्रभाग १२, १५ व १६ साठी १५ झोनल अधिकारी तसेच मनुष्यबळ कक्षासाठी ५ झोनल अधिकारी असून ते अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मतदान केंद्रांवरील संपूर्ण व्यवस्थापन, कर्मचारी समन्वय व अडचणींचे तात्काळ निराकरण करणार आहेत.

शांततामय व पारदर्शकपणे महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज महानगरपालिका निवडणूक भयमुक्त वातावरणात, पारदर्शक व नियमानुसार पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज झाले असून प्रत्येक टप्प्यावर नियंत्रण व समन्वय ठेवण्यात येणार आहे. मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT