Municipal Election: The Income Tax Department is keeping a close watch on black money
परभणी, पुढारी वृत्तसेवा ;
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मतदारांना प्रभावित करण्यासाठी होणाऱ्या काळ्या पैशाच्या गैरवापराला चाप लावण्यासाठी आयकर विभागाने कंबर कसली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि लातूर या पाच महापालिका क्षेत्रांत निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी आयकर विभागाने विशेष भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. ही पथके 24 तास सज्ज राहणार आहेत.
यंदाच्या मनपा निवडणुकांमध्ये सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी आहे. सत्ताधारी भाजपसह शिवसेना (दोन्ही गट), राष्ट्रवादी काँग्रेस (दोन्ही गट), काँग्रेस तसेच वंचित बहुजन आघाडीकडून मोठ्या संख्येने उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले आहेे. या तीव्र स्पर्धेमुळे निवडणूक खर्चात प्रचंड वाढ होण्याची चिन्हे आहेत.
माजी नगरसेवक, सत्ताधारी नेते, उमेदवार किंवा त्यांचे समर्थक संशयास्पद रोख व्यवहार किंवा वाहतूक करत असतील, तर नागरिकांनी तात्काळ आयकर विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे. येत्या काळात तपासण्या आणि छापे टाकण्याची कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
नागपूर कार्यालयाचे नियंत्रण
आयकर विभागाच्या नागपूर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ही स्वतंत्र तपास पथके कार्यरत करण्यात आली आहेत. निवडणूक काळात रोख रकमांची वाहतूक, सोने-चांदी, मौल्यवान वस्तूंची देवाणघेवाण आणि संशयास्पद बँकिंग व्यवहारांवर या पथकांचे बारकाईने लक्ष असणार आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी भेटवस्तू किंवा पैशाचा वापर झाल्यास ती बाब गंभीर गुन्हा मानली जाणार आहे, असा इशारा विभागाने दिला आहे.
संशयास्पद व्यवहार दिसल्यास येथे करा तक्रार
टोल फ्री क्रमांक : 1800 233 0355 / 1800 233 0356
व्हॉट्सॲप क्रमांक : 9403390980 (फोटो व व्हिडिओ पाठवण्यासाठी)
ई-मेलद्वारे : लिखित स्वरूपातही तक्रार करता येईल.