All Party MLAs Memorandum Ajit Pawar
परभणी: मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतीबरोबरच जनजीवनही विस्कळीत झाले असून बीड, लातूर, धाराशिव, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.१६) मराठवाड्यातील आमदारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मराठवाड्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा, अशी मागणी केली. या भेटीत भाजप आमदार रत्नाकर गुट्टे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे, राजेश विटेकर आणि ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील सहभागी झाले होते.
अतिवृष्टीमुळे केळी, ऊस, सोयाबीन, कापूस यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी धान्य वाहून गेले आहे. शेतजमिनीची सुपीक मातीसुद्धा वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. "गेल्या ५० वर्षांत इतका पाऊस कधीच झाला नव्हता, आयुष्यात मी इतकं नुकसान पाहिलं नाही," असे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी सांगितले.
आमदार राजू नवघरे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने ठामपणे उभं राहिलं पाहिजे, तर ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांनी महायुतीने वचननाम्यानुसार शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी, अशी मागणी केली. या आमदारांच्या मागणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले. "आज कॅबिनेट बैठकीत यावर विचार केला जाईल," असे ते म्हणाले.