मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे केवळ चार वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या भयावह घटनेचा तीव्र निषेध करत मानवत शहरातील नागरिक, व्यापारी, सामाजिक संस्था आणि विविध राजकीय पक्षांनी शनिवारी (दि. २२) मोठ्या प्रमाणावर जनआक्रोश मोर्चा काढला. शहरात पूर्णपणे कडकडीत बंद पाळण्यात आला असून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने, व्यापार प्रतिष्ठाने बंद ठेवून मोर्चाला मोठा प्रतिसाद दिला.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात डोंगराळे येथील ४ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या झालेल्या घटनेच्या निषेधार्थ मानवत शहर कडकडीत बंद पाळून तहसील कार्यालयावर शनिवारी ता 22 जनआक्रोश मोर्चा काढून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
शहरात सराफा सुवर्णकार संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनावरून व्यापाऱ्यांनी आपले व्यापारी प्रतिष्ठान कडकडीत बंद ठेऊन मोर्चात मोठा सहभाग नोंदवला. येथील नगरपालिकेपासून मोर्चाला सुरुवात झाली. मुख्य रस्त्यावरून जात असताना चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे, आरोपीला फाशी द्या, न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील अशा घोषणां देण्यात आल्या.
महिला, युवक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना चिमुकली दूर्वा लखन रुपनर हिच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
निवेदनात आरोपीस कठोरात कठोर शिक्षा देऊन फाशीची शिक्षा व्हावी, प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालवावे, सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, पीडित कुटुंबास शासकीय आर्थिक मदत द्यावी, पोलिस अथवा प्रशासनातील कोणतीही निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, पीडित कुटुंबाचे सर्वांगीण पुनर्वसन करावे या मागण्या करण्यात आल्या.
मोर्चामध्ये शहरातील विविध समाज घटक, सामाजिक संस्था, राजकीय नेते, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.