Manwath Parbhani Highway Accident Pudhari
परभणी

Parbhani Accident | मानवत-परभणी महामार्गावर ट्रक-स्कॉर्पिओची समोरासमोर धडक; पाच युवक जखमी

खड्डे चुकविताना अपघात झाल्याची प्राथमिक माहिती; जखमींवर परभणीत उपचार सुरू

पुढारी वृत्तसेवा

Manwath Parbhani Highway Accident

मानवत : मानवत-परभणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील किन्होळा-खरवडे शिवारात शुक्रवारी (दि. ७) रात्री साडेआठच्या सुमारास ट्रक आणि स्कॉर्पिओची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात स्कॉर्पिओमधील पाच युवक जखमी झाले असून, त्यांच्यावर परभणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातात जखमी झालेल्यांमध्ये वसीम कुरेशी, आक्रम कुरेशी, महेबूब मन्सुरी, अदनान शेख आणि महेफुस सय्यद यांचा समावेश आहे. हे सर्व युवक मानवत शहरातील बांगड प्लॉट परिसरातील रहिवासी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे पाचही युवक शुक्रवारी परभणी येथील काम आटोपून स्कॉर्पिओ (क्र. एमएच २३ बीएच ४७४७)ने मानवतकडे परतत होते. किन्होळा-खरवडे शिवारात त्यांची स्कॉर्पिओ आली असता, मानवतकडून परभणीकडे जाणाऱ्या ट्रक (क्र. एमएच ३८ एक्स ५३६९)ने समोरून जोरदार धडक दिली.

धडकेनंतर स्कॉर्पिओचे मोठे नुकसान झाले असून, त्यातील पाचही युवक जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने बाहेर काढून पुढील उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, मानवत-परभणी राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याने वाहनधारकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. रस्त्यावरील खड्डे चुकविताना स्कॉर्पिओचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT