मानवत – पुढारी वृत्तसेवा
मानवत नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीनंतर निकाल लांबल्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिलेल्या दोन आणि 11 प्रभागातील 22 जागांसाठी उभे राहिलेल्या 56 अशा एकूण 58 जणांचे भवितव्य 17 दिवसांकरिता टांगणीला बांधले गेले असून नेतेमंडळी व कार्यकर्ते मात्र सध्या आकडेमोड करण्यात गुंग झाले आहेत.
शहरातील 35 मतदान केंद्रांवर मंगळवारी (ता. 2) एकूण 32 हजार 599 मतदारांपैकी 23 हजार 989 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून हे प्रमाण 73.59 टक्के इतके होते. या मतदानात 16,356 पैकी 12,254 पुरुष मतदारांनी तर 16,243 पैकी 11,753 महिला मतदारांनी मतदान केले. शहरात सर्वाधिक मतदान मोंढा परिसरातील जिल्हा परिषद प्रशालेच्या नवीन इमारतीतील प्रभाग क्रमांक 4 च्या 1 आणि 2 नंबर बुथवर झाले.
या दोन्ही बुथवर दुपारी चारनंतर मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे रात्री सव्वा आठपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. या दोन्ही बुथवर 1044 पैकी 846 म्हणजे 81.03 टक्के आणि 1123 पैकी 914 म्हणजे 81.39 टक्के मतदान झाले.
शहरात सर्वात कमी मतदान दोन ठिकाणी झाले. शहरातील शकुंतलाबाई कत्रूवार विद्यालयातील प्रभाग क्रमांक 10 च्या 2 नंबर बुथवर 62.88 टक्के मतदान झाले. येथे 978 पैकी 615 जणांनी मतदान केले. तर प्रभाग क्रमांक 11 च्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या 2 नंबर बुथवर 867 पैकी 549 म्हणजे 63.32 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी दिली.
येथील तहसील कार्यालयातील एका रूममध्ये मोठ्या पोलीस बंदोबस्तात मतदान यंत्र ठेवण्यात आले असून तहसील कार्यालयाबाहेर व आत दिवसभर तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामध्ये दोन अधिकारी, राज्य राखीव दलाचे 9 जवान आणि 2 पाळ्यांमध्ये 18 पोलीस कर्मचारी रात्रंदिवस बंदोबस्त देणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांनी दिली.
येथील नगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही प्रतिस्पर्धी पक्षाकडून ‘लक्ष्मीअस्त्र’ाचा वापर मोठ्या प्रमाणात झाला असून यात कोट्यवधींची उलाढाल झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे मतदान संपताच बुधवारी (ता. 3) सकाळपासूनच बाजारपेठेत मोठी रेलचेल वाढली. विशेषतः सराफा बाजारासह फर्निचर विक्रेत्यांकडे मोठी गर्दी पाहायला मिळाली. दागिने खरेदीसाठी महिलावर्ग विशेषतः मोठ्या संख्येने दिसत होता.
मानवत नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वयोवृद्ध आणि आजारी रुग्ण एकाही मतदाराला मतदानापासून वंचित राहू नये, या सामाजिक जाणिवेतून करपे ॲम्बुलन्स सर्व्हिसेसने स्तुत्य उपक्रम राबविला. निवडणूक दिवशी रुग्णांना त्यांच्या घरीून मतदान केंद्रापर्यंत सुरक्षित पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिकेतून पूर्णपणे निःशुल्क सेवा उपलब्ध करून देण्यात आली. मागील विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांनी हा उपक्रम राबविला होता. या उपक्रमामुळे अनेक वयोवृद्ध, दिव्यांग व असहाय्य मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला. सामाजिक बांधिलकीबद्दल सर्वपक्षीय नेते, मान्यवर आणि नागरिकांकडून करपे ॲम्बुलन्सचे संतोष करपे यांच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.