शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतकरी सुरेश यादव यांचा सहा एकर ऊस जळून खाक झाला. pudhari photo
परभणी

Parbhani Sugarcane Fire : शॉर्टसर्किटने रामपुरी (बु.) शिवारातील सहा एकर ऊस खाक

रात्री नऊच्या सुमारास दुर्घटना; युवकांच्या तत्परतेने १० ते १५ एकर ऊस बचावला, पंचनामे करून भरपाई द्या

पुढारी वृत्तसेवा

मानवत : तालुक्यातील रामपुरी बु. शिवारात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतकरी सुरेश पंडितराव यादव यांचा सहा एकर ऊस जळून खाक झाला. गट क्रमांक १४२ मध्ये रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. आगीची माहिती मिळताच गावातील युवकांनी घटनास्थळी धाव घेत प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या तत्परतेमुळे शेजारील १० ते १५ एकरांवरील ऊस पिकाचे नुकसान टळले, मात्र यादव यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

यादव यांच्या शेतात ८६०३२ जातीच्या उसाची लागवड होती. निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा आधीच उत्पादनात घट झाली. पाण्याची कमतरता असतानाही ठिबक सिंचन माध्यमातून थोडेथोडे पाणी देत त्यांनी मोठ्या कष्टाने ऊस जगवला होता. मात्र, शॉर्टसर्किटमुळे आगीत काही क्षणांतच सहा एकरांवरील ऊस जळून खाक झाला. रात्रीची वेळ आणि दिवाळीचा सण असल्याने शेतात कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे आग वेगाने पसरली.

घटनेची माहिती मिळताच गावातील युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. युवकांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे शेजारील १० ते १५ एकरांतील ऊस आगीपासून वाचविण्यात यश आले. या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाल्याने संबंधित विभागाने घटनास्थळी तातडीने पंचनामा करावा आणि नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी सुरेश यादव यांनी केली. तसेच जळालेला ऊस वाळण्यापूर्वी संबंधित साखर कारखान्याने तातडीने तोडणी करून घेऊन जावा, अशीही मागणी केली आहे.

शेतकरी सुरेश यादव म्हणाले आधीच पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान झाले. ठिबक सिंचनाच्या साहाय्याने थोडेथोडे पाणी देऊन सहा एकर ऊस मोठ्या कष्टाने जगवला होता. मात्र, शॉर्टसर्किटमुळे डोळ्यादेखत ऊस जळून खाक झाला. शेतातील वाकलेले खांब आणि लोंबकळणाऱ्या तारांकडे महावितरणने वेळीच लक्ष दिले असते, तर कदाचित आज माझ्यावर ही वेळ आली नसती. आता तरी तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी आणि जळालेला ऊस कारखान्याने त्वरित घेऊन जावा.

दरम्यान, महावितरणने परिसरातील धोकादायक विद्युत खांब आणि वीजवाहिन्यांची तातडीने तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT