Wheelchair in Scrap Manwat
मानवत : दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन वापरासाठी अत्यावश्यक असलेल्या व्हीलचेअर थेट भंगारात टाकल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील आठवडे बाजारात उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या व्हीलचेअर नव्याकोऱ्या असून त्यावरील प्लास्टिकचे संरक्षण आवरण (मेनकापड) देखील काढलेले नव्हते, तरीही त्या भंगारामध्ये फेकून दिल्याचे आढळून आले.
शहरातील आठवडे बाजार रोडवर भंगाराचे दुकाने असून या दुकानाच्या बाहेर असलेल्या रोडवर सदरील व्हीलचेयर दिसून आल्या आहेत. नव्या कोऱ्या साहित्याचा खच पाहून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. व्हीलचेअर, लोखंडी फ्रेम, चाके आणि इतर उपयोगी भाग अक्षरशः कवडीमोल दरात भंगारात टाकण्यात आले असल्याचे दिसून आले.
सदरील साहित्य हे कोणत्या शासकीय विभागाचे की एखाद्या रुग्णालयाचे? आहे असा प्रश्न उपस्थित झाला असून शहरात चर्चेला उधाण आले आहे. जर हे साहित्य शासकीय निधीतून खरेदी केलेले असेल, तर तो सरळसरळ शासकीय निधीचा गैरवापर ठरतो. दुसरीकडे, रुग्णालय किंवा आरोग्य यंत्रणेशी संबंधित असल्यास संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.
विशेष म्हणजे, अनेक दिव्यांग व्यक्ती आजही व्हीलचेअरसाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवत असताना, उपयोगात न आलेले आणि नव्यासारखे साहित्य भंगारात जाणे हे प्रशासनाच्या उदासीनतेचे आणि अनागोंदी कारभाराचे ज्वलंत उदाहरण मानले जात आहे.
या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून संबंधित विभाग, रुग्णालय किंवा जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच भंगारात टाकलेले साहित्य जप्त करून गरजू दिव्यांग व्यक्तींना उपलब्ध करून द्यावे, अशी जोरदार मागणी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व दिव्यांग संघटनांकडून केली जात आहे.