

Manwat bike auto collision
मानवत : मानवत बायपासवरील गजानन मंदिराजवळ दुचाकी व ऑटोच्या धडकेत १९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी (दि.२१) सायंकाळी घडली. मृत युवकाचे नाव सोमेश्वर नारायण फाटे (वय १९, रा. कोथाळा) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमेश्वर फाटे हा मानवतहून आपल्या गावी कोथाळा येथे दुचाकीवरून जात असताना गजानन मंदिराजवळ त्याची दुचाकी समोर असलेल्या ऑटोला मागून धडकली. या जोरदार धडकेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर जखमी सोमेश्वरला तातडीने मानवत येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार शरीफ पठाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.