गणेश निर्मळ, माऊली निर्मळ  Pudhari
परभणी

Parbhani Accident | मानवत-परभणी महामार्गावर आयशर - कारची धडक: दोन तरुणांचा जागीच मृत्यू

खरबा येथील तरुणांचा मृत्यू; कारचे पत्रे कापून मृतदेह बाहेर काढले

पुढारी वृत्तसेवा

Manwat Parbhani Highway Eicher Car Collision

मानवत : मानवत-परभणी राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हा शिवारातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ बुधवारी (दि. १) दुपारी साडेतीनच्या सुमारास कार आणि आयशर ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मानवत तालुक्यातील खरबा येथील दोन तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

मृतांमध्ये गणेश तानाजी निर्मळ (वय २५) आणि ज्ञानेश्वर उर्फ माऊली वैजनाथ निर्मळ (वय २२) यांचा समावेश आहे. दोघेही कार (क्र. एमएच ०६ बीएम ६११०) मधून कामानिमित्त परभणीकडे जात होते.

प्राथमिक माहितीनुसार, कोल्हा शिवारातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ कारचा ताबा सुटून ती प्रथम रस्त्यालगतच्या दुभाजकाला धडकली. त्यानंतर समोरून येणाऱ्या भरधाव आयशर ट्रकला (क्र. एमएच २६ एडी १४०१) कारची जोरदार धडक बसली. या धडकेची तीव्रता इतकी होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला.

अपघातात कारमधील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. कारचे पत्रे कापून मृतदेह बाहेर काढावे लागले. रुग्णवाहिका चालक देवा पेडगावकर यांनी दोघांचे मृतदेह मानवत येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले.

घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे, पोलीस कर्मचारी राजू इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहन बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी तत्काळ प्रयत्न केले.

दरम्यान, मानवत-परभणी राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, भरधाव वेग आणि निष्काळजी वाहनचालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. या मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत असल्याने वाहतूक सुरक्षेबाबत प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT