Auto Rickshaw Fire Manwat
मानवत: शहरातील लाड गल्ली, कृष्ण मंदिराजवळ घरासमोर लावलेल्या नवा कोऱ्या ऑटोला अज्ञाताने आग लावून जाळल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.19) पहाटे साडेचार च्या सुमारास उघडकीस आली. यापूर्वीही 8 मार्चरोजी याच भागातील एका नागरिकाची मोटारसायकल जाळल्याची घटना घडली होती. त्याचा तपास अद्याप सुरू असताना ही घटना घडल्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुभम नाथा दहे हे ऑटो रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात. नुकताच त्यांनी नवा ऑटो घेतला होता. 18 मार्चच्या रात्री ऑटो त्यांनी आपल्या घरासमोर लावला. आज पहाटे साडेचार च्या सुमारास ऑटोला आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते जागे झाले. तोपर्यंत ऑटो बराच जळाला होता. या प्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.
शहरातील कृष्ण मंदिर या भागात यापूर्वीही 8 मार्चरोजी किशोर चंद्रकांत सुपेकर यांची घरासमोर ठेवलेली मोटरसायकल अज्ञाताने जाळल्याची घटना घडली होती. याप्रकरणी याबाबत येथील पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंदणी करण्यात आली आहे. मोटार सायकल जाळण्याची घटना ताजी असताना पुन्हा त्याच भागात ऑटो जाळण्याच्या प्रकाराने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पहिल्या गुन्ह्यातील आरोपी अद्याप पोलिसांना सापडले नसून दुसरा गुन्हा घडल्याने पोलीस यंत्रणा चक्रावली आहे.