Parbhani Crime | पिंगळी रेल्वे स्थानकावर दरोड्याच्या तयारीतील दोन जण जेरबंद ; तीन साथीदार फरार

आरोपींकडून धारदार शस्त्रे, मोबाईल फोन व दोन मोटारसायकली असा मुद्देमाल जप्त
Parbhani Crime
Parbhani Crime | पिंगळी रेल्वे स्थानकावर दरोड्याच्या तयारीतील दोन जण जेरबंद
Published on
Updated on

परभणी : तालुक्यातील पिंगळी रेल्वे स्थानक परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास सापळा रचून अटक केली. तर त्यांच्यासोबत असलेले दोन ते तीन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. या कारवाईत आरोपींकडून धारदार शस्त्रे, मोबाईल फोन व दोन मोटारसायकली असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी (दि.८) पहाटे ३.५० वाजण्याच्या सुमारास पिंगळी रेल्वे स्टेशन परिसरात काही संशयित इसम दरोडा टाकण्याच्या उद्देशाने थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचून कारवाई केली. या कारवाई दरम्यान सखाराम किशनराव पवार (वय ५०, रा. कमलापूर, ता. जि. परभणी) व गोपाल सखाराम पवार (वय २०, रा. कमलापूर, ता. जि. परभणी) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

मात्र त्यांच्या सोबत असलेले दोन ते तीन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. फरार आरोपींपैकी एका आरोपीचे नाव अविनाश श्रीराम काळे उर्फ ‘ड्रीम’ (रा. फुलेवाडी सौताडा, ता. पाटोदा, जि. बीड) असे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून इतर आरोपींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. फरार आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडून लोखंडी कत्ती, लोखंडी सुरी, भाला, दोन मोबाईल फोन व दोन मोटारसायकली असा मुद्देमाल आढळून आला. सदर सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम ३१२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी रेल्वे न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शैलेश जोगदंड, एएसआय नेगी, पोहवा राम कातकडे, पोकॉ. सखाराम पवार, राहुल दाभाडे, संजय भेंडेकर, कांबळे, प्रवीण तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे अमोल वावळे, बालाजी काशीटवार, चव्हाण व रणचोरसिंग यादव यांनी संयुक्तरित्या केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news