मानवत : मानवत नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवीत नगराध्यक्षपदासह अकरा प्रभागातील 22 जागांपैकी 16 ठिकाणी दणदणीत विजय मिळवला असून शिवसेना शिंदे गटाचे चार जागी, भाजप व शिवसेना उबाठा गटाचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाले. नगराध्यक्षपदी राणी अंकुश लाड 5391 मतांनी विजयी झाल्या असून त्यांना 23989 मतापैकी 14587 तर त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या सेना भाजप युतीच्या अंजली महेश कोक्कर यांना 9196 मतदान मिळाले.
रविवारी ता 21 सकाळी दहा वाजता येथील तहसील कार्यालयात कडक पोलीस बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला प्रभाग क्रमांक एक ते सहा मतमोजणी करण्यात आली. पहिल्या फेरीपासून अखेरच्या फेरीपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राणी लाड आघाडीवर राहिल्याने विजय निश्चित झाला.
प्रभाग क्रमांक एक अ मधून राष्ट्रवादीचे राजकुमार खरात विजयी झाले त्यांनी शिवसेनेच्या शीलभद्र वडमारे यांचा 169 मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक एक ब मध्ये राष्ट्रवादीच्या अनुराधा वासुंबे विजय झाला असून त्यांनी शिवसेनेच्या सीमा सारडा यांचा 364 मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक दोन अ मधून शिवसेनेच्या विभा भदर्गे यांनी राष्ट्रवादीच्या कविता धबडगे यांचा 52 मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक दोन ब मध्ये राष्ट्रवादीच्या ज्योती आळसपुरे यांनी शिवसेनेच्या शीतल कुऱ्हाडे यांचा फक्त 10 मतांनी पराभव केला.
प्रभाग क्रमांक तीन अ मधून राष्ट्रवादीच्या किशोर लाड यांनी भाजपचे शिवाजी पाटील यांचा 740 मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक तीन ब मधून राष्ट्रवादीच्या नंदिनी मोरे यांनी शिवसेना उबाठाच्या अनुराधा जाधव यांचा 456 मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक चार अ मधून राष्ट्रवादीच्या द्वारका चौधरी यांनी भाजपच्या शकुंतला चौधरी यांचा 470 मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक चार ब मधून भाजपचे शैलेंद्र कत्रूवार यांनी राष्ट्रवादीचे सुरेशचंद्र काबरा यांचा 110 मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक पाच अ मधून चुरशीच्या झालेल्या लढतीत शिवसेनेच्या विक्रमसिंह दहे यांनी राष्ट्रवादीच्या गणेशलाल कुमावत यांचा फक्त दोन मतांनी पराभव केला.
प्रभाग क्रमांक पाच ब मध्ये राष्ट्रवादीच्या वृशाली राहटे यांनी शिवसेनेच्या स्वाती पाटील यांचा 9 मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक सहा अ मधून राष्ट्रवादीच्या मीरा लाड यांनी शिवसेनेच्या दुर्गादाय यांचा 345 मतांनी पराभव केला. सहा ब मध्ये राष्ट्रवादीच्या संजय कुमार बांगड यांनी शिवसेनेच्या अण्णासाहेब बारहाते यांचा 381 मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक सात अ मध्ये राष्ट्रवादीच्या रेखा हलनोर यांनी शिवसेनेच्या अफरोज बेगम बागवान यांचा 539 मतानी पराभव केला. सात ब मध्ये राष्ट्रवादीचे नियामत खान यांनी शिवसेनेच्या शेख नयम जहांगीर यांचा 754 मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक आठ अ मधून शिवसेनेच्या शेख जवेरीया बेगम यांनी राष्ट्रवादीच्या रफिया बी बागवान 424 मतांनी पराभव केला. आठ ब मध्ये शिवसेनेच्या मोहम्मद बिलाल बागवान यांनी 586 मतांनी पराभव केला.
प्रभाग क्रमांक 9 अ मधून राष्ट्रवादी च्या सुशीला लाड यांनी शिवसेनेच्या बळीराम चव्हाण यांचा 1197 मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक 9 ब मधून राष्ट्रवादीच्या भाग्यश्री शिंदे यांनी शिवसेनेच्या जयश्री सोरेकर 733 मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक दहा अ मधून राष्ट्रवादी च्या रूपाली उगले यांनी भाजपच्या ज्ञानेश्वरी रासवे यांचा 443 मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक दहा ब मधून राष्ट्रवादीचे युवा नेते डॉ अंकुश लाड यांनी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा अनंत गोलाईन यांचा 702 मतानी पराभव केला. प्रभाग क्रमांक 11 अ मधून राष्ट्रवादीच्या डॉ देवयानी दहे यांनी भाजपच्या पूजा देशमुख यांचा 559 मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक 11 ब मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुख दीपक बारहाते यांनी भाजपच्या राजेश मंत्री यांचा तब्बल 1232 मतांनी पराभव केला.
एकाच घरातील 4 जण विजयी
नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी चे आमदार राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या मुद्द्यावर झालेल्या निवडणुकीत युवा नेते डॉ अंकुश लाड यांच्या घरातील चार सदस्य निवडून आले असून यामध्ये त्यांच्या पत्नी राणी लाड ह्या नगराध्यक्षपदी तर सदस्य पदी डॉ अंकुश लाड हे स्वतः, त्यांच्या आई सुशीला लाड व त्यांच्या चुलत भाऊ किशोर लाड हे मोठया मताधिक्याने विजयी झाले.
शिवसेना भाजप युतीला मोठा धक्का
मानवत नगरपालिकेची निवडणूक पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर, शिवसेनेचे सईद खान व काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक यांनी मोठी प्रतिष्ठेची केली होती. शिवसेना-भाजपची युती करून सर्व जागेवर आपली उमेदवार उभे केले होते. परंतु त्यापैकी चार जागी शिवसेना शिंदे गट व भाजपचा 1 जागी उमेदवार निवडून आला.