

छत्रपती संभाजीनगर : माजी महापौर रशीद खान यांच्या प्रवेशामुळे आता शिवसेना उबाठा पक्ष राहिला नसून उबाठा मामू पक्ष झाला आहे, अशी टीका पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी केली. तर वंदे मातरमला विरोध करणाऱ्या आणि पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणाऱ्या रशीद खान यांना उद्धव ठाकरे यांनी पक्षात घेतले, असे म्हणत मंत्री सावे यांनीही निशाणा साधला.
शहराचे माजी महापौर रशीद खान यांना शुक्रवारी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी शिव-सेना उबाठा पक्षात प्रवेश दिला. त्यावरून पालकमंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे यांनी रविवारी ठाकरे सेनेवर हल्लाबोल केला.
मंत्री शिरसाट म्हणाले, शहराच्या नामांतराला विरोध करणाऱ्या रशीद खान ऊर्फ मामू यांना उद्धव ठाकरे यांनी पक्षात घेतले. आता त्यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा कुठे आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाचे नाव आता उबाठा मामू पक्ष असे ठेवले पाहिजे. मंत्री सावे यांनीही लगेचच ठाकरे सेनेवर टीका केली. सावे म्हणाले, हे तेच रशीद मामू आहेत, ज्यांनी वंदे मातरमला विरोध केला होता. पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले होते. आता ते उबाठा पक्षाचे सदस्य झाले आहेत.