मानवत: एका विवाहित महिलेचा पाठलाग करत अश्लील इशारे करणाऱ्या तरुणास नातेवाईकांनी जाब विचारला. दरम्यान संतप्त आरोपीने काचेच्या बाटलीने त्या विवाहितेच्या दिरावर हल्ला करून जखमी केले. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, मानवत पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीस अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 21) दुपारी 12 वाजता पाळोदी शिवारातील पिंपळा जाणाऱ्या रस्त्यावर घडली.
आशामती कुंडलिक सुरवसे (रा.जंगमवाडी, मानवत) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. 19 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता आरोपी राहुल श्रीरंग सोनटक्के (रा.सोनुळा) याने आशामती यांच्या सुनेचा पाठलाग करत तिचा मोबाईल क्रमांक मागितला आणि अश्लील वर्तन करत तिला तुला गायरानात नेतो असे म्हणत धमकी दिली.
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर आशामती यांचा पती आणि दिर हे आरोपीस जाब विचारण्यासाठी सोमवारी (दि.21) दुपारी पिंपळा फाटा येथे गेले. त्यावेळी आरोपीने अचानक संतप्त होत हातातील काचेची बाटली दिराच्या उजव्या हातावर फेकून मारली, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपीने शिवीगाळ करत तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकीही दिली.
घटनेनंतर आशामती यांच्या फिर्यादीवरून तात्काळ मानवत पोलीस ठाण्यात पोलिसांनी BNS कलम 74, 118(1), 126(2), 351(2), 352 अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. सहायक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक भारत नलावडे, पोलीस नाईक राहुल मोरे, महेश रणेर, तुकाराम नरघरे यांच्या पथकाने आरोपी राहुल सोनटक्के यास फरार होण्यापूर्वी तातडीने शोध मोहीम राबवून अटक केली आहे.