

ताडकळस : ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बैल चोरीच्या घटना असो की, ताडकळस गावातील घरफोड्या असो सातत्याने अशा घटना घडत आहेत. त्यातच १ महिन्यापासून पावसाने दांडी मारल्याने शेतकरी राजा हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे.
जुलै महिना संपत आला तरी ताडकळस परिसरातील शिवारात पाऊस न पडल्याने शेतातील पिक वाचवण्यासाठी शेतकरी राजा धडपडत असताना रविवारी (दि.२०) रात्रीच्या सुमारास शेतातील सोलार व विद्युत मोटारींमधील वायरमधील ताब्यांची तार अज्ञात चोरट्यांनी लंपास करुन सोलार पॅनलचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांसमोर एक नवीन संकट उभे राहिले असून शेतकऱ्यांसह शेतातील सालगड्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी सर्व शेतकऱ्यांनी ताडकळस पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरुद्ध लेखी तक्रार दिली आहे. घटनास्थळी ताडकळस पोलीस ठाण्याचे सपोनि गजानन मोरे, पोलीस कॉन्स्टेबल चाटे यांनी भेट देऊन चोरी झालेल्या ठिकानाची पाहणी केली. शेतातील वायर चोरणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा पोलिस प्रशासनाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.