Manwat Bypass Road Accident
मानवत : मानवत शहरालगतच्या बायपास रोडवर (राष्ट्रीय महामार्ग ६१) उड्डाणपुलाजवळ भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २७) रात्री सुमारे सव्वा आठ वाजता घडली.
द्वारकादास विष्णुपंत भाकरे (वय ५०, रा. जिजाऊनगर परिसर) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते दुकानातील काम आटोपून एमएच २२ एआर १८९७ क्रमांकाच्या दुचाकीवरून घरी जात होते. उड्डाणपुलाजवळ आल्यानंतर पाथरीकडून परभणीकडे भरधाव जाणाऱ्या एमएच २२ बीसी ५५८५ क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी जबर होती की भाकरे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातावेळी कारमधील एअरबॅग उघडल्याने कारमधील प्रवासी सुखरूप बचावले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देवकते यांच्यासह कर्मचारी किशन पतंगे, शेख गाजियोद्दीन आणि शेख जावेद यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त कार व दुचाकी पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली. शनिवारी दुपारपर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
बायपास रोड ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’
मानवत शहरालगतचा बायपास रस्ता अपघातप्रवण ठरत असून वारंवार जीवितहानी होत आहे. सोमवारी (दि. २३) सायंकाळीही कोकर कॉलेजचे ज्येष्ठ नागरिक उद्धवराव चिंचाणे (वय ६०) यांचा मोटारसायकलच्या धडकेत मृत्यू झाला होता.
राष्ट्रीय महामार्ग ६१ वर या भागात डिव्हायडर नसल्याने अपघातांची संख्या वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. विशेषतः उड्डाणपुलाजवळ रस्ता ओलांडताना अनेक अपघात घडत आहेत. गेल्या वर्षभरात या रस्त्यावर झालेल्या अपघातांत अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
या पार्श्वभूमीवर बायपास रोडवर तातडीने डिव्हायडर बसविण्याची तसेच ग्रामीण रुग्णालयात ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.