मानवतः केंद्राच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या निधीमध्ये मानवत नगरपालिकेत तीन कोटी 58 लाखाचा निधीचा अपहार व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई येथील म्हाडाच्या दक्षता व सुरक्षा विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या फिर्यादीवरून 2019 ते 2022 दरम्यान असलेल्या मानवतच्या तात्कालीन मुख्याधिकारी व संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हाडाने दिलेला निधी वितरीत न करताच तो परस्पर इतर खात्यावर वर्ग करण्यात आल्याचे दिसून आले आहे.
याबाबत बुधवारी 1 जुलै रोजी महेश विष्णू चव्हाण (सहायक पोलीस निरीक्षक, दक्षता व सुरक्षा विभाग, म्हाडा, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. मा. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) प्रत्येक लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रु. 1.50 लाख व महाराष्ट्र राज्य शासनाकडून रु.1.00 लाख एवढी रक्कम अनुदानासाठी वितरीत केली जाते. प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यात सदर रक्कम महाराष्ट्र राज्याच्या State Nodal Agency (SNA) म्हणजेच म्हाडा यांचेमार्फत लाभार्थ्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (Urban Local Bodies, ULB) खात्यात जमा केला जातो. परंतु, प्रधानमंत्री आवास योजना 1.0 संपत असल्याने म्हाडाच्या वित्त विभागाने सदर योजने अंतर्गत वितरीत केलेला निधी, खर्च झालेला निधी व शिल्लक राहिलेला निधी याबाबत ताळमेळ कल्ल्यात संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मधील संबंधित अभियंता यांना म्हाडा कार्यालयात माहिती देण्यासाठी बोलविले होते.
त्या अनुषंगाने मनवत नगरपरिषद, परभणी येथील CLTC यांचेवतीने श्री.एन.बी. व्यवहार-CLTC, एम. एम. कदम लेखापाल व पी. डी. हरकाल-Internal Auditor यांनी दि.06.06.2025 रोजी वित्त विभाग, म्हाडा यांना अशी माहिती दिली की, त्यांनी PMAY अनुदानाचा निधी हाताळण्याकरीता तीन बँक खाते असल्याचे कळविले.
त्यांतर्गत आय.सी.आय.सी.आय. बँकेचे दि.01.04.2019 ते दि.30.03.2022, कॅनरा बँकेचे दि. 15.09.2020 ते दि.14.11.2024 व बँक ऑफ महाराष्ट्र दि.03.12.2022 ते दि. 15.05.2025 या कालावधीमधील बँक स्टेटमेंटही सादर केले.
वित्त विभाग, म्हाडा यांनी सदर बँक स्टेटमेंट्सची तपासणी केली असता त्यांचे असे निदर्शनास आले की, सदर योजने अंतर्गत 3 कोटी 58 लाख एवढी रक्कम केवळ लाभार्थ्यांना देय असताना सदरचा निधी लाभार्थ्यांव्यतिरिक्त अपहार करून इतर खात्यांवर अनियमितपणे वर्ग झालेली आहे.
याबाबत वित्त नियंत्रक, म्हाडा यांनी मुख्य अधिकारी, मनवत नगरपरिषद, परभणी यांना वारंवार सदर निधी म्हाडाकडे परत करणेबाबत कळविले. परंतु, सदर बाबत संबंधित नगरपरिषदेकडून उत्तर अद्यापपर्यंत अप्राप्त आहे. तरी, सदर प्रकरणी शासनाच्या निधीचा अपहार व शासनाची फसवणूक झाल्यामुळे तात्कालीन मुख्याधिकारी व इतर संबधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे हे करीत आहेत. सदरील गुन्हा दाखल झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.