मानवत – परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यात ऊस दराच्या प्रश्नावरून तणाव वाढला आहे. ऊसाला पहिली उचल 3200 रुपये द्यावी या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी (1 डिसेंबर) मध्यरात्री मानवत तालुक्यातील मंगरूळ पाटी येथे एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या हेडला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
सदर ट्रॅक्टर हे पाथरीहून पोखर्णीकडे जात होते. मध्यरात्री दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. अचानक आग लागल्याचे चालकाला लक्षात येताच त्याने प्रसंगावधान राखत ट्रॅक्टर बाजूला घेतले. मात्र, आग कशी आणि कोणी लावली याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही.
गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात ऊस प्रश्न तापलेला आहे. सारंगापुरात झालेल्या ऊस परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ऊसाला 3200 ची पहिली उचल जाहीर न केल्यास कारखान्यांना सुरळीत सुरू होऊ दिले जाणार नाही, असा इशारा दिला होता. तसेच दर जाहीर न झाल्यास उसाची वाहतूक रस्त्यावर आणू नये, असेही शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले होते.
परंतु, जिल्ह्यातील कारखानदारांकडून अद्याप 3200 रुपयांचा दर जाहीर न झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. याच कारणामुळे जिल्ह्यातील कारखान्यांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. सध्या साइखेडा येथील ट्वेंटीवन शुगर कारखान्याबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे.
दरम्यान सोमवारीच कारखानदारांनी आंदोलन स्थळी बाउन्सर पाठवून शेतकऱ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला. यामुळे वातावरण आणखी तापले. रात्रीच अज्ञात व्यक्तींनी ऊस वाहतुकीसाठी जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या हेडला आग लावल्याचा प्रकार समोर आला. याशिवाय वेगवेगळ्या रस्त्यांवर ऊस घेऊन जाणाऱ्या काही ट्रॉल्यांची हवा सोडून देऊन आंदोलनकर्त्यांनी निषेध नोंदविल्याचे समजते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगण्यात आले की,
“जिल्ह्यातील कारखानदारांनी ऊस दराची घोषणा न करता शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन आणखी तीव्र केले जाईल.”
यासोबतच संघटनेने पुन्हा एकदा स्पष्ट आवाहन केले की,
“दर जाहीर होईपर्यंत जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्याने ऊस रस्त्यावर आणू नये.”
या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून आग लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. शेतकऱ्यांच्या संतापामुळे आणि परिसरातील चिघळलेल्या वातावरणामुळे मानवत व पाथरी भागात सतर्कता वाढवण्यात आली आहे.