Male Sterilization : पुरुष नसबंदीचा दर ०.२ टक्क्यांवर File Photo
परभणी

Male Sterilization : पुरुष नसबंदीचा दर ०.२ टक्क्यांवर

उद्दिष्टपूर्तीही होईना : जिल्ह्यात ४ डिसेंबरपर्यंत पंधरवडा कार्यक्रम सुरू

पुढारी वृत्तसेवा

Male sterilization rate at 0.2 percent

परभणी, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील कुटुंब नियोजनाच्या अंमलबजावणीचा ऑक्टोबर २०२५ अखेरचा आढावा आरोग्य विभागाने नुकताच जाहीर केला. पुरुष नसबंदीची कामगिरी अत्यंत चिंताजनक असल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्ह्यात २०२४-२५ मध्ये पुरुष नसबंदीचे ४१४ उद्दिष्ट निश्चित करण्यात आले, मात्र वर्षअखेरीस केवळ एकच शस्त्रक्रिया नोंदली गेली. हीच परिस्थिती चालू २०२५-२६ मध्येही कायम असून, ७०८ उद्दिष्टांपैकी आजतागायत फक्त एकच पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया झाल्याची नोंद आहे. परिणामी प्रगती केवळ ०.२ टक्क्यांवर आहे. यातच शासन स्तरावरून दि.२१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरपर्यंत पुरुष नसबंदी पंधरवडा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

गतवर्षी कुटुंब नियोजनातील एकूण ११,६५० लक्षांकांपैकी ६,७९६ शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या. चालू वर्षातहील ६,७९६ शस्त्रक्रियांचीच नोंद झाली असून, एकूण लक्षांकाच्या केवळ २०.८ टक्के उद्दिष्टांची पूर्तता झाली. यामुळे ४,८९५ प्रकरणांचा प्रशासकीय तुटवडा अजूनही बाकी आहे. दोन अपत्यांनंतर शस्त्रक्रियेत गतवर्षी ५,५७१ लक्ष्यांपैकी ३,२५० शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या असल्या तरी यंदा ९,९६५ च्या मोठ्या लक्षांकापैकी आजतागायत ३,२५० शस्त्रक्रिया झाल्या आहेत. बिनटाका शस्त्रक्रिया महत्त्वाच्या घटकात दोन्ही वर्षांतही एकही शस्त्रक्रिया न झाल्याने हा निर्देशांक सलग दोन वर्षे शून्य टक्के राहिला. छाया सेंटर मॉनिटरिंगमध्ये तर प्रगती आणखी मर्यादित असून, गतवर्षी ५८ नोंदी असताना चालू वर्षी केवळ २७ नोंदीच झाल्या.

जिल्ह्यात दीर्घकालीन गर्भनिरोधक साधनांबाबत महिलांत जागृती वाढताना दिसत आहे. चालू वर्षात आययूडी (तांबी) मध्ये ५६१ आणि पीपीआययूसीडीमध्ये १,०७७ नोंदी झाल्या. गतवर्षात हेच आकडे अनुक्रमे ५०९ आणि ३९६ होते. यावरून महिलांचा सहभाग आणि आरोग्य यंत्रणेच्या जनजागृती उपक्रमांना मिळणारा प्रतिसाद स्पष्ट वाढत असल्याचे दिसत आहे. गर्भनिरोधक गोळ्यांच्या वितरणात यंदा लक्षणीय वाढ झाली असून, ४,६४५ लाभार्थीना गोळ्या देण्यात आल्या. निरोध वापरकर्त्यांची संख्याही वाढत २,८७९ वर पोहोचली. या दोनही घटकांत होणारी वाढ जनजागृतीचा सकारात्मक परिणाम असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

पंधरवडा मोहिमेचे दोन टप्पे

नसबद सदर अभियानांतर्गत दि. २१ ते २७ नोंव्हेबरदरम्यान संपर्क आठवडा असून, यात जिल्ह्यातील आशा व एएनएम कर्मचाऱ्यांमार्फत कुटुंब नियोजनासाठी योग्य समजल्या जाणाऱ्या जोडप्यांची यादी तयार होत आहे. या कार्यकर्त्यांद्वारे घरा-घरांत जाऊन पुरुष नसबंदी पध्दतीबद्दल माहिती देणे, शंका दूर करणे व पुरुषांना एनएसव्ही स्वीकारण्यासाठी प्रेरित करण्यावर भर दिला जात आहे. याशिवाय यापूर्वी एनएसव्ही करून घेत-लेल्या लाभार्थीचे अनुभवही प्रसार माध्यमांतून व गावोगावी बैठकीतून मांडले जात आहेत. तसेच दि. २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरदरम्यान सेवा आठवड्यातून उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांतील शस्त्रक्रियागृहात पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया होणार आहेत. या सेवा स्टैंडर्ड प्रोटोकॉल ऑफ स्टेरिलायझेशन सर्व्हिसेस प्रमाणेच दिल्या जाणार असून, जिल्हा व तालुकास्तरावर प्रशिक्षित सर्जन उपलब्ध करून देण्यात येतील. गरज भासल्यास खासगी तसेच निवृत्त सर्जनांचीही मदत घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ यांनी दिली आहे.

विशेष मोहिमा राबवण्याचे नियोजन

पुरुष नसबंदीचा अत्यल्प प्रतिसाद, अंतरा इंजेक्शन उपक्रमातील धिमी गती आणि दोन अपत्यावर शस्त्रक्रिया या घटकांतील मर्यादित प्रगती लक्षात घेता आरोग्य विभागाने यापुढे गावपातळीवरील विशेष समुपदेशन मोहिमा, पुरुष नसबंदी जनजागृती उपक्रम आणि अंतरा इंजेक्शनच्या प्रोत्साहनासाठी स्वतंत्र मोहिमा राबवण्याचे नियोजन केले आहे. जिल्ह्याने काही निर्देशांकांत समाधानकारक झेप घेतली असली तरी पुरुष नसबंदी, बिनटाका शस्त्रक्रिया आणि मॉनिटरिंग या क्षेत्रात अधिक प्रभावी प्रयत्नांची अजूनही आवश्यकता आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT