परभणी : शहराने शनिवारी (दि.२०) सकाळी एक अभूतपूर्व आणि अत्यंत संवेदनशील घडामोड अनुभवली. पहाटेपासूनच दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शहरात मोठ्या प्रमाणावर गुप्त कारवाई सुरू केल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली. शहरातील तब्बल १५ ठिकाणी एकाचवेळी धाड टाकल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून या कारवाईमागे नेमके काय कारण, याबाबत दिवसभर चर्चांना उधाण आले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील एटीएसच्या सुमारे २६ अधिकारी आणि कर्मचार्यांचे विशेष पथक पहाटे ७ वाजण्याच्या सुमारास परभणीत दाखल झाले. कोणतीही पूर्वकल्पना न देता या पथकाने शहरातील विविध भागांमध्ये एकाचवेळी छापेमारी सुरू केली. धार रोड परिसरातील मुमताज कॉलनी, जनता मार्केट, राजकोट स्वीट्सजवळील परिसर, नोबल हँडलूम अँड होजिअरीजवळील काही आस्थापना तसेच इतर काही ठिकाणी तपास आणि चौकशीचे सत्र सुरू असल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे या संपूर्ण कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. स्थानिक पोलीस प्रशासनालाही मर्यादित माहिती देण्यात आल्याचे बोलले जात असून, एटीएसच्या अधिकार्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती बाहेर जाऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतल्याचे दिसले. त्यामुळे या धाडींचे नेमके स्वरूप काय, कोणाच्या संदर्भात तपास सुरू आहे आणि तपासाचा मुख्य मुद्दा काय आहे, याबाबत अधिकृत स्तरावर कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, सुरक्षा यंत्रणांच्या सूत्रांकडून मिळणार्या संकेतांनुसार काही संशयास्पद आर्थिक व्यवहार, सोशल मीडिया नेटवर्क, देशविरोधी प्रचार, टेरर फंडिंग किंवा दहशतवादी संघटनांशी संबंधित धागेदोरे तपासले जात असल्याची चर्चा रंगली.
काहींच्या संपर्कांचे, मोबाईल डेटा, संगणक प्रणाली आणि आर्थिक व्यवहारांच्या नोंदींची तपासणी सुरू होत्या. तथापि, या सर्व बाबींना अधिकृत दुजोरा मिळाल नाही. धार रोडवरील मुमताज कॉलनी परिसर हा या कारवाईचा प्रमुख केंद्रबिंदू ठरल्याचे दिसले. एटीएसच्या अधिकार्यांसह स्थानिक पोलिस दल मोठ्या प्रमाणात या परिसरात तैनात होते. काही काळासाठी परिसरातील हालचालींवर विशेष लक्ष ठेवले. येणार्या-जाणार्या व्यक्तींची चौकशी, परिसरातील हालचालींवर नजर आणि तपासासाठी आवश्यक सर्व उपाययोजना राबविल्याने परिसराला अक्षरशः छावणीचे स्वरूप होते.
स्थानिक नागरिकांमध्ये सुरुवातीला संभ्रमाचे वातावरण होते. मात्र नंतर एटीएसची कारवाई असल्याचे समजताच परिसरात उत्सुकता वाढली. अनेकांनी आपल्या घरांच्या गच्च्यांवरून आणि रस्त्यांच्या कडेला उभे राहून या घडामोडींवर लक्ष ठेवले. एटीएस आणि पोलीस प्रशासनाने दिवसभर कोणतीही अधिकृत माहिती जाहीर न केल्याने शहरात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. काही जण ही कारवाई राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याचे सांगत आहेत, तर काहींच्या मते संशयित आर्थिक व्यवहारांच्या चौकशीचा हा भाग असू शकतो. मात्र अधिकृत खुलासा होईपर्यंत कोणत्याही चर्चेला पुष्टी मिळू शकत नाही.
या कारवाईत काही संशयित व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले का, कोणते साहित्य जप्त केले का, इलेक्ट्रॉनिक उपकरणे किंवा महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत झाली का, याबाबतही माहिती उपलब्ध झाली नाही. परभणी शहरात यापूर्वीही विविध केंद्रीय आणि राज्य तपास यंत्रणांनी कारवाया केल्या आहेत. मात्र एकाचवेळी १५ ठिकाणी एटीएसकडून छापेमारी झाल्याची घटना अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे या कारवाईकडे केवळ परभणीच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले. तपास पूर्ण झाल्यानंतर एटीएसकडून अधिकृत माहिती जाहीर होण्याची शक्यता असून, या कारवाईतून कोणते धक्कादायक तपशील समोर येतात याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
क्रूझर गाड्यांवरील ‘A, B, C, D’ मार्किंगची चर्चा
कारवाई दरम्यान आणखी एक बाब नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरली. एटीएसचे अधिकारी ज्या क्रूझर वाहनांतून शहरात आले, त्या वाहनांवर ‘A, B, C, D असे मार्किंग होते. प्रत्येक पथकाला स्वतंत्र जबाबदारी दिल्याचे यावरून स्पष्ट होत. कारवाईचे नियोजन पूर्वनियोजित व अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आल्याचे चित्र पहायला मिळाले. शहरातील अनेक भागांत सकाळपासूनच या वाहनांची वर्दळ वाढली होती. अचानक वाढलेल्या सुरक्षा हालचालींमुळे नागरिकांनी घटनास्थळांकडे धाव घेतली. अनेक ठिकाणी लोकांची गर्दी जमल्याचे चित्र दिसले.