Parbhani ZP  Pudhari
परभणी

Mahayuti alliance conflict Parbhani : राज्यात सत्तेत तर जिल्ह्यात एकमेकांच्या विरोधात

महायुतीतील घटक पक्षांमध्ये कायमच बिघाडी, वादाच्या पार्श्वभूमीवर जि.प.अध्यक्ष निवडीकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

सुभाष कच्छवे

परभणी : राज्यात भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना सत्तेत आहे. असे असले तरी महायुतीतील तिन्ही घटक पक्षातील लोकप्रतिनिधी-पदाधिकारी जिल्ह्‌‍यात मात्र कायम एकमेकांच्या विरोधात असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीमध्ये सारेकाही आलबेल नसून कायमच बिघाडी झाल्याचे वारंवार दिसून आलेले आहे. या पाश्वभूमीवर 18 मार्च रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्याकडे प्रमुख काही खात्यांचे राज्यमंत्री पद असून जिल्ह्याचे पालकमंत्री पदही त्यांच्याकडे असल्यामुळे प्रामुख्याने जिल्ह्यातील सत्ता केंद्रच त्यांच्याकडे असून पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाविषयी महायुतीतील घटक पक्षाच्या आमदारांची असलेली नाराजी पार वरिष्ठ पातळीवर एकमेकांच्या तक्रारी करण्यापर्यंत पोहंचली असल्याचा इतिहास आहे.

परभणीत महायुतीत असलेला अवमेळ हा वरिष्ठ पातळीवरील नेत्यांचीही डोकेदुखी ठरल्याचे अनेकवेळा चर्चेला आलेले आहे. महायुतीतील प्रमुख 3 पक्षांमध्ये असलेली श्रेयवादाची लढाई ही परभणीकरांना अूुभवण्यास आलेली आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत भाजप व शिंदेंची शिवसेना यांची युती होईल, असे दोन्ही पक्षाकडून सांगीतले जात असताना शेवटच्या क्षणी भाजपाने शिंदे सेनेला झटका दिला होता.

दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढल्यामुळे त्याचा फटकाहेी भाजपा व शिवसेनेला बसल्याचे मतुदानाच्या आकडेवाडीवरून स्पष्ट झाले होते. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी मनपा निवडणुकीत जोरदार ताकद लावूनही त्यांना अपेक्षित यश प्राप्त झाले नव्हते. मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रारंभीपासूनच स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका घेतली होती.

मनपा निवडणुकीनंतर झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीतही भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचे दिसून आले. मनपा, नगरपालिका निवडणुकीत जे झाले तेच जिल्हा परिषद निवडणुकीतही पहावयास मिळाले. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषदेतही स्वतंत्रपणे लढले. भाजपाने शिंदेच्या शिवसेनेसोबत युती केल्याचे पत्रकार परिषद घेवून जाहीर केले तरी ही युती फक्त परभणी व जिंतूर तालुक्यापुरतीच मर्यादीत असल्याचे दिसून आले होते. त्यातही शिंदे सेनेची अवघ्या 4 जागांवर बोळवण करण्यात आली होती.

जिंतूर, परभणी वगळता भाजप व शिंदे सेनेने एकमेकांच्या विरोधात उमेदवारही दिल्याचे दिसून आले. पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. राजेश विटेकर, माजी आ. विजय भांबळे, गंगाखेडचे आ. रत्नाकर गुट्टे यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रूतच होता. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी गंगाखेड विधानसभा मतदार संघात आ. गुट्टे यांच्या समर्थकांना भाजपचे ए.बी. फॉर्म दिल्यामुळे पालकमंत्री बोर्डीकर व आ. रत्नाकार गुट्टे यांच्यातील वाद शमल्याचे बोलले जात होते.

पूर्णा पंचायत समिती सभापती निवडीवरून यात पून्हा ठिणगी पडली असून बहुमत असतानाही गुट्टेंना त्यांचा सभापती बसवता आलेला नाही. पाथरी विधानसभा मतदार संघात आ. राजेश विटेकर आणि शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्यातील वाद सर्वश्रूत आहेच.

एकंदरीत राज्यात सत्तेत असलेले महायुतीतील लोकप्रतिनिधी-पदाधिकारी जिल्ह्यात मात्र एकमेकांच्या विरोधात असल्याचे वास्तव आहे. या पार्श्वभूमीवर 18 मार्च रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT