परभणी : सुभाष कच्छवे
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढविण्याचे भाजपाने निश्चित केले असून त्यादृष्टीने काही महिन्यांपासून तयारीही चालविण्यात आली आहे. भाजपा बरोबरच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही स्वबळावर निवडणुक लढण्याचे वेध लागले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढविण्याचे भाजपाने निश्चित केले असून त्यादृष्टीने काही महिन्यांपासून तयारीही चालविण्यात आली आहे.
राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी ताकद दिली असुन याच ताकदीच्या जोरावर जिल्ह्यात भाजपाचा शतप्रतिशत भाजपासाठी प्रयत्न सुरू आहे. पालकमंत्री बोर्डीकर यांनी यापुर्वी अनेक वेळेला भाजप
स्वबळावर निवडणुक लढवेल असे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असल्यामुळे नेते मंडळी स्थानिक पातळीवर निर्णय घेतील असे स्पष्ट केले आहे. महायुती मधिल घटकपक्ष जरी आमने-सामने उभे ठाकले तरी लढती या मैत्रीपुर्ण होतील असे फडणवीस म्हणाले होते. आजघडीला महायुतीमध्येच असलेल्या भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तेसाठी उघड उघड स्पर्धा असल्याचे स्पष्ट आहे. पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचा विरोध डावलुन माजी आ. विजय भांबळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामावुन घेत एक प्रकारे अजित पवारांनी पालकमंत्री बोर्डीकर यांना शह देण्याचा प्रयत्नच केल्याचे स्पष्ट आहे. भाजप स्थानिक स्वराज्य -संस्था निवडणुकीसाठी काही महिन्यांपासूनच स्वबळावर लढण्याची तयारी करत असुन भाजपच्या अनेक नेत्यांनी तशी कबुलीही दिली आहे. अजित पवारांची राष्ट्रवादीही जिल्हा परिषदेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध मेळाव्यामधुनही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्वबळाची भाषा केली आहे. जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असणाऱ्या जिल्हा परिषदेवर ताबा मिळवण्यासाठी वरील दोन्ही पक्षामध्ये तीवृ सत्तासंघर्ष होणार असल्याचे स्पष्ट आहे. जिल्ह्याच्या राजकारणात जिंतूर तालुका प्रामुख्याने या सत्ता संघर्षाचा साक्षीदार ठरणार असल्याची परिस्थिती आहे. त्याची सुरवात पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर व माजी आ. विजय भांबळे यांनी एकमेकांवर आरोप करून झालेलीच आहे.
स्थानिकांचा वाद, नेत्यांच्या डोक्याला ताप
भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थानिक नेत्यांचा वाद दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसाठी डोकेदुखी ठरत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून एकमेकांच्या तक्रारी करण्यात येत आहेत. यामुळे स्थानिकांचा वाद आणि नेत्यांच्या डोक्याला ताप अशी अवस्था जिल्ह्यात आज महायुतीमध्ये असल्याचे दिसून येत आहे.