International School Name Misuse pudhari
परभणी

International School Name Misuse: राज्य, CBSE बोर्डाच्या शाळांना आता इंटरनॅशनल, ग्लोबल शब्द वापरता येणार नाहीत, सरकारचा मोठा निर्णय

Anirudha Sankpal

परभणी : पुढारी वृत्तसेवा :

राज्यातील खाजगी (स्वयं अर्थसहाय्यित) शाळांच्या नावांमध्ये इंटरनॅशनल, ग्लोबल, कॉन्व्हेंट, सैनिकी यांसारख्या आकर्षक पण दिशाभूल करणाऱ्या शब्दांचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंदर्भात दि.२ एप्रिल रोजी नवीन शासन निर्णय जारी करून शाळांच्या नावांबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. (maharashtra government rules for school names)

उच्च दर्जाचा नुसता आभास

गेल्या काही वर्षांत अनेक खाजगी शाळांनी आपल्या नावात इंटरनॅशनल किंवा ग्लोबल असे शब्द वापरून उच्च दर्जाच्या शिक्षणाचा आभास निर्माण केल्याचे आढळून आले होते. प्रत्यक्षात मात्र अशा अनेक शाळा कोणत्याही आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाशी संलग्न नसल्याने पालक व विद्यार्थ्यांची दिशाभूल होत होती. यावर आळा घालण्यासाठी शासनाने कठोर भूमिका घेतली आहे.

नवीन नियमांनुसार आयबी, केंब्रिज, आयजीसीएसई यांसारख्या आंतरराष्ट्रीय बोर्डाशी संलग्न असलेल्या किंवा संलग्न होण्याच्या प्रक्रियेत असलेल्या शाळांनाच इंटरनॅशनल, ग्लोबल, युनिव्हर्सल, वर्ल्ड, युरो असे शब्द वापरण्याची परवानगी असेल. राज्य मंडळ, सीबीएसई किंवा इतर राष्ट्रीय बोर्डाच्या शाळांना हे शब्द वापरता येणार नाहीत असे म्हटले आहे.

याच शाळांना कॉन्व्हेंट शब्द वापरता येणार

कॉन्व्हेंट हा शब्द फक्त ख्रिश्चन नन्स (भिक्षुणी) समुदायाद्वारे चालविल्या जाणाऱ्या शाळांसाठीच वापरता येणार आहे. इतर कोणत्याही ट्रस्ट, संस्था किंवा कंपनीला हा शब्द वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच सैनिकी शाळा म्हणून अधिकृत मान्यता असलेल्या संस्थांनाच सैनिकी हा शब्द नावात वापरण्याची मुभा असेल. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारा गैरसमज टाळला जाणार आहे.

तर कारवाई होणार

शासनाने स्पष्ट केले की, शाळेच्या दर्जा, सुविधा किंवा अभ्यासक्रमाबाबत चुकीचा संदेश देणारे कोणतेही शब्द वापरता येणार नाहीत. ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कारवाई केली जाऊ शकते. हा शासन निर्णय भूतलक्षी प्रभावाने लागू नसून, पुढील काळात येणाऱ्या सर्व नवीन शाळा प्रस्तावांवर व सेवांवर लागू राहणार आहे.

दिखाऊपणा कमी करण्याचा प्रयत्न

या निर्णयामुळे शाळांच्या नावांमधील दिखाऊपणा कमी होऊन शिक्षण क्षेत्रात अधिक पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पालकांना योग्य माहिती मिळून शाळा निवडताना होणारी फसवणूक मोठ्या प्रमाणात टळणार आहे. हा निर्णय उशिरा का होईना, पण अत्यंत आवश्यक होता. नावापेक्षा गुणवत्तेला महत्त्व देण्याची वेळ आली आहे. एकूणच, नाव मोठं लक्षण खोटं या प्रवृत्तीला आता लगाम बसणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT