Livestock killed by lightning in Aherwadi Shivara
पूर्णा : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील आहेरवाडी येथील शेतशिवारात ता.६ मे रोजी रात्री सोसाट्याचा वादळीवारा सुटला होता. यातच रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान अचानक शेतकरी दिगंबर नामदेव मोरे यांच्या गट क्रमांक ३०३ मधील शेत आखाड्यावर वीज पडली. या दुर्घटनेत गोठ्यात बांधलेल्या जनावरांपैकी दोन गायी, तीन वासरे वीज पडून जागीच दगावली तर अन्य पाच सहा गायी वासरे होरपळून गंभीर जखमी झाली.
त्यातच विजेमुळे अखाड्यालगत रचून ठेवलेल्या कडब्याने पेट घेतला. अखाड्यावरील धान्य, कपडे व ईतर संसारोपयोगी साहित्य व काही गोण्या रासायनिक खत जळून त्याची होळी झाली. या घटनेत शेतकरी दिगंबर मोरे यांचे सुमारे ५ लाख रुपये आर्थिक नुकसान झाल्याची माहिती छगनराव मोरे यांनी दिली.
जखमी जनावरांवर पशूधन विकास अधिकारी डॉ. कचरे, डॉ दुधारे मॅडम व त्यांची पशूधन आरोग्य टिम उपचार करीत आहे. दरम्यान, घटनास्थळी पोउनि अमर चाऊस, जमादार दुधमल, तलाठी डोनगडे, भगवान खंदारे यांनी भेट देऊन पंचनामा केला.
सदर घटनेमुळे शेतकरी वर्गातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मागील तीन दिवसांपासून पूर्णा तालूका परिसरात सायंकाळी व रात्री उशिरा अचानक वादळीवारे सुटत आहे. यात, सोसाट्याच्या वादळीवा-यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या विहरीवरील कृषी पंपाचे सोलार पॅनल उखडून जमीनदोस्त झाली आहेत.
दरम्यान अंबा, लिंबोनी फळांची प्रचंड प्रमाणात पडझड झाली आहे. तसेच ब-याच भागात मोठी झाडे उन्मळून पडली. कडबे उडून गेली. घरावरील टिनपत्रे उडून जात लांब जाऊन पडली. शेवगा शेंगा झाडे उपटून पडली. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.