पूर्णा : शहरातील आवेश कॉलनीतील अवैध कत्तलखान्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मंगळवारी (दि. 19) पहाटे पावणेसात वाजता धाडसी सर्जिकल स्ट्राईक केला. या कारवाईत कत्तलीसाठी आणलेले 7 बैल, 96.5 किलो गोमांस आणि कत्तलीचे साहित्य असा एकूण 3 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही गोपनीय कारवाई केली. कत्तलखान्यात एका बैलाची कत्तल झाल्याचे उघड झाले, तर लाल कंधारीसह इतर 7 बैल कत्तलीच्या तयारीत होते. पोलिसांनी त्यांची सुटका करून त्यांना ताडकळसच्या साईबाबा गोशाळेत रवाना केले.
याप्रकरणी विशेष पथकाचे अधिकारी गोविंद चुडावकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी शेख रहेमान शेख नूर, शेख मुजीब शेख रहेमान, शेख रफीक शेख जलाल आणि शेख इब्राहिम शेख अब्दुल गणी (सर्व रा. विजयनगर, पूर्णा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
कारवाईत 96 किलो मांस, 52 किलो मुंडके-पाय, 36 किलो आतडे, दोन कुऱ्हाडी, सुऱ्या आणि 10 हजारांची रोकड जप्त करण्यात आली. पुढील तपास सपोनि गजानन पाटील हे पोलीस अधीक्षक कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.