Parbhani News : गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा File Photo
परभणी

Parbhani News : गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा

विशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या ४ नंबर पथकाने शनिवारी (दि.५) दुपारी धडक कारवाई करत सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पुढारी वृत्तसेवा

Illegal sand mining in Godavari riverbed

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील धनगर टाकळी शिवारातील गोदावरी नदीपात्रात डिझेल इंजिनच्या साहाय्याने अवैधरीत्या वाळू उपसा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर विशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या ४ नंबर पथकाने शनिवारी (दि.५) दुपारी धडक कारवाई करत सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून नदीपात्रात अवैध वाळू उपशाची माहिती स्थानिक प्रशासनासह पोलिस यंत्रणेकडे येत होती. याच पार्श्वभूमीवर विशेष पोलिस पथकाने धनगर टाकळी परिसरात सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईत एक डिझेल इंजिन, तराफा आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. कारवाईमध्ये फौजदार शकुंतला डुकरे, पोहेकॉ. गौतम ससाणे, पोहेकॉ. खत्री, चुडावा पोलिस ठाण्याचे फौजदार अरुण मुखेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांचा सहभाग होता.

पथकाने गोदावरी नदीपात्रात अचानक छापा टाकत वाळू उपसा करणाऱ्यांना धक्का दिला आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर रौंदळे (रा. धनगर टाकळी) याच्याविरोधात गौण खनिज कायदा, वाळू चोरी, तसेच संबंधित अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशांत किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अरुण मुखेडकर हे करीत आहेत. विशेष पोलिस पथकाच्या या कारवाईमुळे परिसरात वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असून अवैध वाळू उपशाला लगाम बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT