परभणी

मानवत तालुक्यात पावसाचे थैमान; ओढ्याच्या पुरात एक महिला बेपत्ता

करण शिंदे

मानवत, पुढारी वृत्तसेवा : मानवत शहरासह ग्रामीण भागात सोमवारी (दि.10) पावसाने रौद्ररुप धारण केले होते. दरम्यान पावसाने तब्बल 2 तास थैमान घातले. या अचानक पडलेल्या मोठ्या पावसामुळे ओढा ओसांडुन वाहत होता. यामध्ये घराकडे जाणाऱ्या दोन शेतकरी महिला पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्या. यापैकी 1 महिला झाडामध्ये अडकल्याने सापडली आहे. तर दुसरी महिला अजूनही बेपत्ता असून तिचा शोध घेतला जात आहे.

सुनीता धुराजी लव्हाळे (वय.40) असे पुरात वाहून गेलेल्या महिलेचे नाव आहे. सध्या दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने कापूस पेरणीसाठी त्या दोघी शेतात गेल्या होत्या. दुपारी चारच्या सुमारास अचानकपणे जोरदार पाऊस सुरू झाल्याने या दोघी घरी जात होत्या. गावामधील ओढ्यातून जात असतांना अचानक पाण्याचा मोठा प्रवाह आल्याने या दोन महिला वाहून गेल्या. यापैकी रंजना सुरवसे या एका झाडामध्ये अडकल्याने ग्रामस्थांनी त्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढले. सुरवसेंवर एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती हॉस्पिटलच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान पुरात वाहून गेलेली महिला सुनीता लव्हाळे यांचा शोध ग्रामस्थासह महसूल प्रशासनाची टीम घेत असून तहसीलदार पांडुरंग माचेवाड घटनास्थळी ठाण मांडून आहेत. या पावसाने शहरातील हनुमान मंदिर परिसरात असलेल्या नाल्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. यामुळे तब्बल तीन तास गावाचा मुख्य रस्ता बंद होता.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT