Parbhani News : तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना मुख्यालय बंधनकारक  File Photo
परभणी

Parbhani News : तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना मुख्यालय बंधनकारक

महसूल मंत्र्यांचा फेसॲपचा निर्णय शेतकऱ्यांसाठी फायद्याचा

पुढारी वृत्तसेवा

Headquarters mandatory for Talathi, Mandal officers

परभणी, पुढारी वृत्तसेवा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांना फेस अॅपद्वारे हजेरी लावणे बंधनकारक केल्याने गावपातळीवर तलाठी, मंडळ अधिकारी हे शेतकऱ्यांना आपल्या कामासाठी उपलब्ध होणार आहेत. महसूल मंत्र्यांचा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक ठरणार आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तलाठ्यांपासून उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंत फेस अॅपद्वारे हजेरी लावणे बंधनकारक केले आहे. यामुळे आठवडा-आठवडा सज्जाकडे न फिरकणारे तलाठी, मंडळ अधिकारी आता गावपातळीवर आपल्या मुख्यालयी दररोज दिसणार आहेत. मुख्यालयाच्या गावातूनच त्यांना फेस अॅपद्वारे हजेरी द्यावयाची आहे. ही यांनी हजेरी न दिल्यास त्यांना कर्तव्यावर गैरहजर असल्याचे समजून गैरहजेरी टाकली जाणार आहे. जे कर्मचारी फेसअॅपद्वारे हजेरी देणार नाहीत, त्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतनही निघणार नाही. यापूर्वी तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, उपजिल्हाधिकारी कार्यालय येथील कर्मचाऱ्यांची आधार अबडेट हजेरी होती.

परंतु तलाठी, मंडळ अधिकारी क्षेत्रिय कर्मचाऱ्यांसाठी कुठलीच हजेरीची तरतूद करण्यात आलेली नव्हती. जिल्हाभरातील अनेक तलाठी हे मुख्यालयी राहत नसल्याचे वास्तव असून त्यांनी नेमलेले खाजगी माणसेच तलाठ्यांची सर्व कामे पाहायची. आठ-आठ दिवस तलाठी सज्जाकडे फिरकत नसल्यामुळे शेतकऱ्यांना तलाठ्यांचे घर शोधत शहरात यावे लागायचे. महसूल मंत्र्यांच्या फेस अॅपद्वारे हजेरी बंधनकारक केल्याच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे संकेत असून तलाठ्यांना शोधण्यासाठी शहरात येण्याची वेळही त्यांच्यावर आता येणार नाही.

यामुळे शेतकऱ्यांचे शारीरिक श्रम वाचणार असून आर्थिक बचतही होणार आहे. तलाठी, मंडळ अधिकारी व महसूलचे अन्य क्षेत्रिय कर्मचारी या फेसअॅपला कितपत दाद देतात हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुख्यालयी जाणे टाळले तर वेतन मिळणार नसल्याचे महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केल्यामुळे इच्छा असो अथवा नसो तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना मुख्यालयी जावे लागणार आहे. फेस अॅप शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी कसे लाभदायी ठरणार आहे हे येणाऱ्या काळात स्पष्टच होणार आहे.

सामान्य जनतेला वेळेत सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेसअॅपद्वारे तलाठ्यापासून ते उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंत हजेरी लावणे बंधनकारकः केल्यामुळे सामान्य जनतेला वेळेत सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांनाही आपल्या जबाबदारीची जाणीव होणार असून महसूल विभागाशी संबंधित सातबारा उतारे, उत्पन्न प्रमाणपत्र, जमीन मोजणी, फेरफार यासारख्या कामांसाठी शेतकरी व नागरिकांना आता तलाठ्यांना शोधत शहरात येण्याची गरज भासणार नाही. एकंदरीत फेसअॅपद्वारे हजेरी बंधनकारक केल्यामुळे महसूल विभागाच्या कामामध्ये गतिमानता येऊन तलाठी, मंडळ अधिकारी व अन्य क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा शेतकरी व नागरिकांशी संवाद वाढणार आहे. या संवादातून कामामध्ये सुलभता येणार आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तलाठ्यापासून उपजिल्हाधिकारी यांच्यापर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांना फेस अॅपद्वारे कर्तव्याच्या ठिकाणी हजेरी लावण्याचा घेतलेला निर्णय स्वागताहार्य आहे. यापूर्वी तहसील, उप जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यालयीन कर्मचाऱ्यांना आधारबेस हजेरी होती. तलाठी, मंडळ अधिकारी व अन्य क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना कुठलीच हजेरीची तरतूद शासनाने केली नव्हती. त्यांना आता फेसअॅपद्वारे हजेरी द्यावी लागेल.
-नानासाहेब द. भेंडेकर, राज्य उपाध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना, परभणी,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT