परभणी : पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी फाईल मंजुरीच्या बदल्यात तडजोडीनंतर ८ हजार रुपये लाच स्वीकारणाऱ्या तालुक्यातील किन्होळा येथील ग्रामसेविकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई परभणी शहरातील कारेगाव रोडवरील ग्रामसेविकेच्या राहत्या घरी बुधवारी (दि.२०) करण्यात आली.
अटक झालेल्या ग्रामसेविकेचे नाव आम्रपाली लक्ष्मणराव काकडे (वय ३८) असून त्या ग्रामविकास अधिकारी म्हणून तालुक्यातील किन्होळा ग्रामपंचायत कार्यालय येथे कार्यरत होत्या. तक्रारदार व त्यांच्या आईस पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. त्याचा पहिला हप्ता १५ हजार रुपये प्रत्येकी, म्हणजे एकूण ३० हजार रुपये दि. २१ जुलै २०२५ रोजी त्यांच्या बँक खात्यावर जमा झाला होता. यानंतर तक्रारदार यांनी दुसऱ्या हप्त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रांची फाईल घेऊन दि. १४ ऑगस्ट रोजी ग्रामसेविका काकडे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी काकडे यांनी प्रत्येकी फाईलसाठी ५ हजार रुपये अशा दोन फाईल्ससाठी एकूण १० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कळवली. दि. १८ ऑगस्ट रोजी संबंधित ग्रामसेविकेने तक्रारदाराला त्यांच्या परभणी येथील कारेगाव रोडवरील राहत्या घरी बोलावले. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष पडताळणी केली असता, तडजोड करून प्रत्येकी फाईलसाठी ४ हजार रुपये असे एकूण ८ हजार रुपये लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर बुधवारी (दि.२०) ग्रामसेविकेने त्यांच्या परभणी येथील कारेगाव रोड या ठिकाणी राहत्या घरी तक्रारदाराकडून ८ हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष कारवाई करत ग्रामसेविका काकडे यांना रंगेहाथ अटक केली. ही सापळा कारवाई पोलीस निरीक्षक मनिषा पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस उप अधीक्षक महेश पाटणकर, अल्ताफ मुलाणी, पोह.रवींद्र भुमकर, सिमा चाटे, कल्याण नागरगोजे, राम घुले, शेख जिब्राईल, नरवाडे व लहाडे यांचा समावेश होता. या कारवाईस पोलीस अधीक्षक संदीप पालवे व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.संजय तुंगार (नांदेड परिक्षेत्र) यांचे मार्गदर्शन लाभले.
आरोपी ग्रामसेविकेचा मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आला असून त्याची सखोल तपासणी केली जाणार आहे. तसेच, आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ नुसार परभणी येथील नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीच्या घराची झडतीही सुरु असून अधिक तपशील पुढील तपासातून उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.