Maharashtra Gram Panchayat Employees Strike
मानवत: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करावी व निवृत्तीवेतन लागू करावे. यासह अन्य मागण्यांसाठी राज्यातील 27 हजार 920 ग्रामपंचायत कर्मचारी आजपासून (दि.१) संपावर गेले आहेत.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना या संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचारी संपावर गेले असून वेतनश्रेणी व निवृत्तीवेतन यासोबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू करणे, भविष्य निर्वाह निधीची रक्कम कामगार भविष्य निर्वाह निधी संघटन या कार्यालयात जमा करणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन लागू करणे, वसुलीची उत्पन्नाची अट शासन निर्णयानुसार सरपंच कार्यकारी मंडळ ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यावर आहे. याची अंमलबजावणी मात्र असंघटित ग्रामीण भागात काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर लादली आहे.
त्यामुळे कर्मचाऱ्यांवर एक प्रकारे सरकार अन्याय करत आहे. याप्रकरणी शासनाने वेतनासाठी लादलेली वसुलीची व उत्पन्नाची अट तत्काळ रद्द करून कर्मचारी यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या महिन्याला देण्याची व्यवस्था करावी, तसेच कामगार व ऊर्जा विभागाच्या शासन निर्णयानुसार किमान वेतन हे दर पाच वर्षाला लागू करण्याचे आदेश असताना देखील शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना यापूर्वी 2013 ला किमान वेतन लागू केले होते. परंतु यानंतर 2018 मध्ये वेतन नवीन नियम लागू करणे गरजेचे असताना शासनाने जाणून बुजून दुर्लक्ष करून 10 ऑगस्ट 2020 ला किमान वेतन लागू केले. शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना 2018 पासून नियमानुसार किमान वेतन लागू करून फरकाची रक्कम मंजूर करावी. या सर्व सात मागण्यांसाठी संप सुरु आहे.
मानवत पंचायत समिती समोर सुरु केलेल्या काम बंद आंदोलनात सोपान देशमुख मराठवाडा विभाग सहसचिव सोपान देशमुख, तालुकाध्यक्ष अंगद मोरे, सचिव रामकिशन कोरडे, उपाध्यक्ष रामराव तिथे, रामेश्वर नीलवर्णा, मुंजाभाऊ निर्मळ, धोंडीराम पवार, निवृत्ती शिंदे, शिवाजी काकडे आदी कर्मचारी सामील झाले आहेत.