Parbhani News : शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची चिखलातून पायपीट  File Photo
परभणी

Parbhani News : शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची चिखलातून पायपीट

गंगारवेड शहरातील प्रकार; पालिका प्रशासन विरोधात पालकांतून संताप

पुढारी वृत्तसेवा

Gangakhed Students walk through mud for education

अजित गणाचार्य

गंगाखेड : शहरातील सारडा कॉलनी, ओम नगर व रतन नगर या भागातील विद्यार्थ्यांना आनंदवन विद्यालयात पोहचण्यासाठी दररोज अक्षरशः चिखलातून वाट काढावी लागत आहे. सुमारे ५०० हून अधिक विद्यार्थी शिक्षणासाठी या मार्गाचा वापर करत असले तरी हा रस्ता आजही पूर्णतः डबक्यांत आणि चिखलात बुडालेला आहे. स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि फक्त तात्पुरत्या उपायांवर भर दिल्याने शाळेत जाण्याचा मुलांचा प्रवास एक कठीण आव्हान ठरत आहे.

शहरातील सदरील परिसरातील शासकीय नोंदीप्रमाणे सुमारे ५०० फूट लांबीचा आणि ३० फूट रुंदीचा अधिकृत रस्ता आहे. मात्र तो आजवर कधीच कायमस्वरूपी पक्का करण्यात आलेला नाही. दरवर्षी पावसाळा सुरू होताच रस्त्यावर पाणी साचते, माती आणि मुरूम ओसरून चिखलाचा महासागर तयार होतो.

पालिकेने यावर दरवर्षी मुरूम टाकून 'तात्पुरती मलमपट्टी' केली असली तरी ती काही दिवसांतच निष्फळ ठरत असते. या सर्व बाबींमुळे शाळेत जाण्यासाठी या चिखलातून वाट काढताना अनेकदा विद्यार्थी घसरतात, कपडे खराब होतात, पाय घसरून अपघात होतात. पावसाळ्याच्या दिवसात पालक मुलांना पाठविताना भीतीने ग्रासलेले असतात.

काही वेळा तर परिस्थिती इतकी बिकट होते की पालकांना मुलांना शाळेत पाठविणेच टाळावे लागते. शिक्षणाच्या प्रवासात अशा अडथळ्यांमुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण देखील येतो व त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता तयार होते. गंभीर बाब म्हणजे जेथे कोणतीही वस्ती नाही, अशा रिकाम्या प्लॉट्ससाठी सिमेंटचे रस्ते तयार करण्यात आले. त्या रस्त्यांवर कोणताही वावर नाही, तरीही तेथे हजारो रुपयांचा खर्च केला गेला.

याउलट जेथे प्रत्यक्षात मुले दररोज शिक्षणासाठी धडपडत आहेत, त्या भागात प्रशासनाने केवळ तोंडी आश्वासने आणि कागदी कारवाई करून वेळ मारून नेली आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल राठोड यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देत दरवर्षी प्रशासनाकडे तोंडी आणि लेखी अर्ज करूनही आजवर पक्या रस्त्यासाठी कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. आम्ही सोशल मीडियावरून सातत्याने आबाज उठविला आहे.

प्रशासनाचा प्रतिसादच नाही

सदरील रस्त्याच्या गंभीर समस्येबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस प्रतिसाद आलेला नाही. नागरिकांच्या संतापाचा सूर दिवसेंदिवस वाढत आहे आणि जर लवकरात लवकर कार्यवाही झाली नाही, तर या भागात जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही असे दिसत आहे. शिक्षणाच्या प्रवासात अडथळे निर्माण करणाऱ्या अशा मूलभूत समस्यांकडे प्रशासनाने गंभीरतेने पाहिले पाहिजे. चिखलातून वाट काढत शाळेत जाणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा हा आपल्या व्यवस्थेच्या अपयशावर प्रश्नचिन्ह उभे करतो. आता वेळ आहे, केवळ आश्वासने नाही, तर कृतीची असे नागरिक सांगत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT