Flood hits Goda banks; crops suffer major damage
सोनपेठ, पुढारी वृत्तसेवा तालुक्यात सप्टेंबर महिन्यात पडलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे गोदाकाठासह उपनद्यांनी धोक्याची पातळी ओलांडत महापुराचा तडाखा दिला. परिणामी शेकडो शेतकऱ्यांचे खरिप पीक वाहून गेले, जनावरे, संसारोपयोगी साहित्य व शेतीसह मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू आजही थांबलेले नाहीत.
तालुक्यात गेल्या वीस वर्षांत प्रथमच नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी पार केली. विशेषतः जायकवाडी व माजलगाव धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविल्याने गोदा-वरीने रौद्ररूप धारण केले. परिणामी गोदावरी काठावरील गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. या महापुरात उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतीची जमीन पूर्णपणे खरडून गेली आहे.
शेतकरी विनायक राठोड म्हणाले, नदीकाठासह परिसरातील शेतातील उभ्या पिकांचे होत्याचे नव्हते झाले. नुकसानीची ही सल अत्यंत वेदनादायक आहे. माझे पूर्ण पीक पाण्याखाली गेले आहे. तसेच शेतकरी दादाराव राठोड या शेतकऱ्याने आपली वेदना मांडताना शेतकऱ्यांचे नगदी पीक समजले जाणारे सोयाबीन, कपाशीचे पीक पुराने पूर्णपणे नष्ट केले.
पूर ओसल्यानंतर चिखलात रुतलेल्या उरलेल्या पिकांकडे पाहवत नाही. निसर्ग पिकू देत नाही आणि शासन पिकलेले विकू देत नाही. शासनाने त्वरित मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. आजही शेतशिवारात पाणी साचले असून, नजरेसमोर उभे असलेले नुकसान पाहून शेतकरी खचलेला आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
महापुरात जनावरे वाहून गेली असून, गोठ्यांतील गाई-म्हशींचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबांचे घरातील संसारोपयोगी साहित्यही पुराच्या पाण्यात वाहून गेले.